Manoj Jarange Slams Devendra Fadnavis: जालन्यामधील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. गुणरत्ने सदावर्तेंनी मनोज जरांगेंना अटक केल्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर जरांगेनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे फडणवीस यांना समज देण्याची मागणी आपल्या भाषणात केली. तसेच आपल्याला अटक करणं हे सोपं आहे का? असा सवाल जरांगेंनी सदावर्तेंना विचारला आहे.


मला अटक करणं एवढं सोपं आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सदावर्ते हे फडणवीसांचे कार्यकर्ते आहेत असं लोक म्हणतात. फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी", असं जरांगेंनी आपल्या भाषणात म्हटलं. सदावर्तेंचा एकेरी उल्लेख करत जरांगेंनी कठोर शब्दांमध्ये त्यांच्यावर टीका केली. "ते (सदावर्ते) रात्री म्हणलं मला अटक करा. ते म्हणतंय मी हिंसा करीन. अरे, मराठ्यांची औलाद हिंसा करणाऱ्यांची नाही. त्याला यश मिळायचं होतं तेव्हा त्याने एक मराठा आणि लाख मराठाची घोषणा आझाद मैदानात दिली होती. आता एक लाख मराठे एकत्र आलेत, लेकरांचं कल्याण होणार आहे. ह्यो हिंसा करणार आहे आणि याला अटक करा. मला अटक करणं एवढं सोपं आहे का?" असं म्हणातच उपस्थितांनी जरांगेंना प्रतिसाद दिला.


नक्की वाचा >> 'तू मराठ्यांचं रक्त पिऊन...'; 7 कोटींच्या खर्चाच्या दाव्यावरुन जरागेंचा भुजबळांवर हल्लाबोल


थेट मोदींना केलं फडणवीसांना समज देण्याचं आवाहन


सदावर्तेंना लक्ष्य करताना जरांगेंनी फडणवीस यांचा थेट उल्लेख केला. "भाऊ तुला एकदा सुट्टी दिली मराठ्यांनी. तू मराठ्यांचं वाटोळं केलं आहे. मराठ्यांच्याविरोधात तुच कोर्टात गेला आहेस. मराठ्यांविरोधात आग ओकणं कमी करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याला समज द्या. तो तुमचा कार्यकर्ता आहे. मराठे अंगावर घेऊ नका. याच मराठ्याने तुम्हाला 106 आमदार निवडून दिलेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणण्यात मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. पंतप्रधान साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना समज द्या. खालचे कार्यकर्ते ते अंगावर घालत आहेत," असं म्हणत जरांगेंनी थेट पंतप्रधान मोदींना फडणवीसांना समज देण्याची मागणी केली. 


नक्की वाचा >> राजकारण्यांना घाम फोडणारे, लाख मराठ्यांना एकत्र करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?


आता सहन करण्याची क्षमता नाही


"तुमच्यासाठी मराठ्यांनी काहीही केलेलं आहे. उलट मी राज्य आणि केंद्र सरकारला आवाहन करतो मराठ्यांना आरक्षण द्या हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना विरोध करायचा बंद करा आणि मराठ्यांना तातडीने आरक्षण द्या. गुलाल टाकायला दिल्लीला मराठे ट्रकच्या ट्रक भरुन येतील," असंही जरांगे म्हणाले. "आम्हाला राजकारणाचं काही करायचं नाही. आम्हाला आमच्या लेकरांचं कल्याण महत्त्वाचं आहे. आता सहन करण्याची क्षमता मराठ्यांमध्ये राहिलेली नाही," असं जरांगे म्हणाले.