`6 वाजेपर्यंत वाट पाहणार अन्यथा...`; जरांगेंकडून शिंदे, फडणवीस, अजित पवारांना डेडलाइन
Maratha Aarakshan Manoj Jarange: अजित पवारांना बारामतीमध्ये प्रवेश करण्यासाठी मराठा समाजाकडून केला जात असणारा विरोध, फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया नोंदवली.
Maratha Aarakshan Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला आहे. सूचक शब्दांमध्ये तिन्ही नेत्यांना इशारा देताना समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर पुढील वाट फार कठीण असेल असं म्हटलं आहे. तसेच गावबंदीबद्दल बोलताना, तुम्ही गावांमध्ये हिंडून काही होणार नाही. त्याऐवजी मुंबईमध्ये जमा आणि एका दिवसाच्या विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण देण्याचा ठराव मांडून मंजूर करत मराठ्यांना पाठबळ द्या, असं आवाहान मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे.
कोणाच्या जिवतीस धोका झाला तर...
"वयोमर्यादेचा अंदाज घेऊन आमरण उपोषण सुरु करा. उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सुरु करा. 29 पासून सुरु करा ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी सुरु करा. संपूर्ण गाव एकजुटीने एकत्र बसा. गावं एकजुटीने उपोषणाला बसल्याने सरकारवर दबाव तयार होतो का? सरकार आपल्याकडे गांभीर्याने बघतंय का हे समजेल. आपल्या गावात किंवा दारात कोणात्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचं नाही. आपणही कोणत्याही नेत्याच्या दारात जायचं नाही," असं जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांना सांगितलं आहे. तसेच पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी, "उपोषण आंदोलनादरम्यान कोणाच्या जिवतीस धोका झाला तर सर्व जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची असेल," असं जरांगे पाटील म्हणाले. "तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन 1 तारखेपासून सुरु होईल. त्याची माहिती नंतर देईन. आरक्षण मिळणार त्याची काळजी करु नका. आत्महत्या करु नका," असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलं.
पोटात पाणी नसल्याने...
उपोषण सुरु केल्यानंतर प्रकृतीसंदर्भात काही त्रास होतोय का याबद्दल विचारलं असता जरांगे पाटलांनी, "पाणी पोटात नसल्याने थोडा त्रास होतोय. पण माझ्या त्रासापेक्षा समाजाचा त्रास मोठा आहे. त्यांना जाणूनबुजून मोठं होऊ दिलं जात नाही," असं उत्तर दिलं.
आरक्षणाचा प्रश्न सोडवावावाच लागेल, 6 ची डेडलाइन
राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावाच लागेल असं सांगताना मनोज जरांगे पाटील यांनी, "ज्यांनी पालकत्व स्वीकारलं त्यांना जनतेच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. आम्ही 6 वाजेपर्यंत वाट पाहणार. सरकार किती इमानदार आहे. जनतेशी किती प्रामाणिक आहे. सरकार दगाफटका करणार आहे का? की प्रश्नाचं उत्तर देऊन प्रामाणिकपणाने उत्तर देणार हे 6 वाजेपर्यंत कळेल," अशी प्रतिक्रिया नोंदवली.
... तरच समाज तुमच्यावर लक्ष ठेवेल
अजित पवार बारामतीमध्ये कारखान्यासंदर्भातील कार्यक्रमासाठी जाणार आहे. त्यांना विरोध केला जात आहे, असं म्हणत पत्रकाराकडून प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, "समाजाने जो निर्णय घेतला त्याविरोधात कोणत्याच पक्षाच्या नेत्याने जाऊ नये. कारण समाजाच्या प्रश्नाला सरकारने प्रथम मानलं पाहिजे. विरोधीपक्ष आणि सत्ताधारी आमदार-खासरादांनी एकत्र येऊन सगळ्यांनी मुंबईत बसलं पाहिजे. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलवून आरक्षण दिलं पाहिजे. हा लढा आमच्या खांद्यांना खांदा लावून सर्वांनी लढला पाहिजे. तरच समाज त्यांच्यावर लक्ष ठेवेल," असं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे, फडणवीसांनी संपर्क केला का?
एकनाथ शिंदे, फडणवीसांनी संपर्क केला आहे का? असं विचारलं असता जरांगे पाटील यांनी, "नाही. कोणाचा फोन नाही, उत्तरं नाही. पण मराठ्यांचा प्रस्न गांधीर्याने घ्यायचा नसलातर त्यांना इथून पुढं कळेल की मराठ्यांचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन कसं चालेल. तुम्ही हे आंदोलन सहजतेने घ्याल. तर पुढचा रस्ता तुम्हाला अवघड आणि कठीण जाईल," असा इशाराच दिला.