औरंगाबाद : वाळूजमध्ये गुरुवारी झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी सुमारे वीस ते पंचवीस संशयितांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणातील आरोपींचा काल रात्रीपासून कसून शोध सुरू आहे. यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री एन्ड अग्रिकल्चर असोसिएशन' म्हणजेच सीएमआयए या संघटनेनं ही पत्रकार परिषद घेत माहिती दिली. या नुकसानीचा निषेध म्हणून आज काही कंपन्या बंद राहणार आहेत. 


मराठा मोर्चाच्या महाराष्ट्र बंद दरम्यान गुरुवारी औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक परिसरात प्रचंड नुकसान झालं असल्याची माहिती औरंगाबादच्या उद्योजक संघटनेनं दिलीय. बंद दरम्यान ६० पेक्षा जास्त मोठ्या कंपन्या आणि १५ हून अधिक लहान कंपन्यांचं नुकसान झालंय. कंपनीची सुरक्षा व्यवस्था तोडून लोक आत घुसले आणि कंपन्यात नासधुस केली. 


आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांची मजल कंपन्यांच्या थेट बोर्डरुममध्ये जाऊन तोडफोड करण्यापर्यंत गेली. कंपनीच्या आवारातील फोर व्हीलर, बसवर त्यांनी हल्ला केला. आम्ही नागरिकांना रोजगार देतोय तर माग आम्हाला सॉफ्ट टार्गेट का केलं जातंय? असंही उद्योजकांनी म्हटलंय. 'आंदोलन तुमचं मग नुकसान आमचं का?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 


'प्रशासन जर सुरक्षा देवू शकत नसेल तर कंपन्या किती दिवस बंद ठेवाव्या तेही सांगा' असा प्रश्न उद्योजकांनी पत्रकार परिषदेत विचारलाय. सुरक्षा दिली गेली नाही तर औरंगाबादमधून उद्योगधंदे घेऊन बाहेर पडणार, असा इशाराही उद्योजकांनी दिलाय.