Maratha Arakshan : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या (Marath Reservation) मागणीसाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाचा आज 10 वा दिवस आहे...काल राज्य सरकारने मराठवाड्यातील महसुली नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याचा निर्णय घेतला. शिवाय आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन देखील देण्यात आलंय. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा जीआर पाहूनच आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण सोडायचं की सुरूच ठेवायचं याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर  वंशावळीत कुणबीचा उल्लेख असेल त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचं या जीआरमध्ये नमूद करण्यात आलं. या जीआरची प्रत माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी मनोज जरांगे यांना सोपवली. जीआरची प्रत देऊन जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. 


उपोषणावर ठाम
पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा करत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना जीआरची प्रत दिली. तसंच  सुधारणा असल्यास मुंबईत येऊ चर्चा करण्याची विनंती केली. त्यानुसार चर्चा करण्यासाठी जरांगे शिष्टमंडळ पाठवणार आहेत. मात्र सुधारणेबाबत जरांगे ठाम आहेत. त्यामुळे सरकार सुधारणा करणार का याकडे लक्ष आहे


दुसरीकडे सरकारने काढलेल्या जीआरमधून मनोज जरांगे यांनी दोन शब्द बदलण्याची मागणी केलीय. वंशावळीत कुणबी नोंद असल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळेल या उल्लेखावर त्यांनी आक्षेप घेतलाय. वंशावळीच्या नोंदी आमच्याकडे नाहीत, त्यामुळे सरकारने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी त्यांनी केलीय. अध्यादेशातले 'वंशावळ असल्यास' हे शब्द वगळून सरसकट प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी त्यांनी केलीय. सुधारणा केलेला अध्यादेश घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं अशी मागणी त्यांनी केली. 


तर इतर कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी आज पुन्हा एकदा दिली. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, हे सिद्ध करण्याचं काम सुरू आहे... त्यामुळं मराठा आरक्षण द्यावं, अशी विनंती सुप्रीम कोर्टाला करू, असंही त्यांनी सांगितलं... 


जरांगेच्या तब्येतीची माहिती
मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसलेल्या जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्या किडनीवर परिणाम होऊ लागला आहे असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलंय. त्यांच्या रक्तातली नायट्रोजन लेव्हल वाढलीय असं डॉक्टर म्हणाले.