COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत या समाजाकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनादरम्यान हे कृत्य करणाऱ्या सुमारे ४ हजार समाजकंटकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हुल्लडबाजी करणारे, तोडफोड करणाऱ्या तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक किंवा समन्ययक यांचा समावेश नाही. तसेच, मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.


चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; बससेवा ठप्प


दरम्यान,चाकणमध्ये आज (मंगळवार, ३१ जुलै) सकाळी तणावपूर्ण शांतता आहे. चाकणमध्ये जाणारी एसटी सेवा बंद आहे. सकाळपासून पीएमपीएमएलची बससेवाही ठप्प आहे. काल (सोमवार, ३० जुलै) चाकणमध्ये १२ ते १५ बसेस फोडण्यात आल्या. चाकण परिसरातल्या काही शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी देण्यात आलीय. तर अनेक पालकांनी मुलांना शाळेत न पाठवणं पसंत केलंय.


पोलिसही जखमी


राजगुरूनगर आणि चाकणला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. बसस्टॉपवर मोठी गर्दी झालीय. दरम्यान काल झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या चाकणचे पोलीस निरीक्षक चौधरींचा कार्यभार आता तळेगावचे पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात आलाय. पोलीस कॉन्स्टेबल अजय भापकर गंभीर जखमी आहेत. पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगुळकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे देखील कालच्या हिंसाचारात जखमी आहेत.