Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठी चार्ज केल्याने राज्यभरामध्ये मागील दोन दिवसांपासून निषेध केला जात असतानाच आजचा दिवस यासंदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे. रविवारी रात्री जालन्यामध्ये मराठा आंदोलक आणि शिंदे सरकारची चर्चा निष्फळ झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज अंतरवाली सराटी गावाला भेट देणार आहेत. आजचा दिवस या आंदोलनासंदर्भात आणि मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा असणार आहे. जाणून घेऊयात याचबद्दलच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1) ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भाजपाचे आमदार नितेश राणेंसहीत रविवारी सायंकाळी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात जाऊन आंदोलकांना भेटले. सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजनांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती सरकारच्यावतीने महाजन यांनी केली.


2) पुढील 2 दिवसांत आरक्षण द्या अशी मागणी आंदोलकांनी महाजन यांच्याकडे आपली बाजू मांडताना केली. मात्र 2 दिवसांमध्ये निर्णय घेणं शक्य नाही मागण्यांसाठी 1 महिन्यांचा वेळ देण्याची विनंती गिरीश महाजनांकडून करण्यात आली. त्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरल्याने जालन्यातील उपोषण सुरुच राहणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे.


3) मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आज (4 सप्टेंबर 2023 रोजी) महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आली आहे.


4) मराठा आरक्षण आणि सुविधा संदर्भात राज्य मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मुंबईतील 'सह्याद्री' अतिथीगृहावर पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 


5) मुंबईतील या बैठकीला औरंगाबाद विभागीय आयुक्त तसंच जालना, नांदेड, लातूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत सहभागी होणार आहेत.


6) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यामधील अंतरवाली सराटी गावाला भेट देण्यासाठी सकाळीच रवाना झाले आहेत. रविवारी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज यांनी फोनवरुन जरांगे यांच्याशी संवाद साधला होता. 


7) मनसे आंदोलकांच्या पाठीशी आहे असं राज यांनी जरांगेंना सांगितलं. त्यानंतर जरांगेंनी पोलिसांनी लाठीमार का केला याचा जाब सरकारला विचारला पाहिजे असं राज यांच्याशी संवाद साधताना म्हटलं.


8) जालनातल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे  प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत समितीची मंगळवारी बैठक बोलावण्यात आली आहे.


9) महसूल मंत्री राधाकृ्ष्ण विखे-पाटील यांच्या दालनात उद्या ही बैठक पार पडणार आहे. प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सूसुत्रता आणण्यासाठी काय करता येईल याबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे.


10) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चर्चेला येण्याचं निमंत्रण दिलं असल्याची माहिती फडणवीसांनी जरांगेंना दिली.


11) पोलिसांनी लाठीचार्ज टाळायला पाहिजे होता. सरकार पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करत नसल्याचंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासनही फडणवीसांनी दिलं आहे.


12) जालना जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली. तसंच सभा, मिरवणुका आणि मोर्चावरही बंदी असेल. अप्पर जिल्हाधिका-यांनी हे आदेश लागू केले आहेत.


13) 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुवस्था अबाधित राहण्यासाठी आदेश काढण्यात आले आहेत. 4 सप्टेंबरच्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 17 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.


14) पोलीस अधिक्षक किंवा उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी विशेषरीत्या परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका आणि मोर्चाला हे आदेश लागू नसतील.


15) मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक दिल्याने आज राज्यभरामध्ये होत असलेल्या तलाठी परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.