मुंबई : मराठा आरक्षण मुद्द्यावरुन विवेक या तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी यासंदर्भात ट्वीट करत राज्य सरकारने याबाबतीत पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावावा असे आवाहन केले. पण या ट्वीटचा आधार घेत भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. पार्थ पवारांच्या मागणीची राज्य सरकार गंभीरपणे दखल घेईल का ? की त्यांना कवडीची किंमत देणार ? असा प्रश्न भाजप नेत्यांनी रिट्वीट करुन विचारत राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवेक या तरुणाने मन हेलावून टाकणारी चिठ्ठी लिहिली आहे. मी एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात मोठ व्हायची इच्छा होती. नीट ही मेडीकलची परीक्षा दिली आहे पण मराठा आरक्षण नसल्याने माझा नंबर लागला नाही. माझ्या घरच्यांची ऐपत नाही. त्यामुळे मी आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी केंद्र आणि राज्य सरकारला कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल असे त्याने चिठ्ठीत लिहीले. 



विवेकची ही चिठ्ठी आणि फोटो पार्थ पवारांनी ट्वीटरवर शेअर केला. आणि असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून मराठा नेत्यांनी जागे व्हा आणि या कारणाविरुद्ध लढा असे आवाहन केले. तसेच मराठा आरक्षणप्रश्नी लक्ष देण्याची विनंती राज्य सरकारला केली. 



मराठा आरक्षण प्रश्न न्यायालयात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचं सरकार राज्यात सत्तेत आहे. पार्थ यांचे वडील उपमुख्यमंत्री पदावर आहेत. या पार्श्वभुमीवर पार्थ पवारांच्या या ट्वीटने विरोधकांना आयत कोलीत मिळालंय आणि राजकारणात चर्चेला सुरुवात झालीय.