मराठा समाज आक्रमक! कोल्हापुरात हसन मुश्रीफांना घेराव, तर नांदेडमध्ये खासदाराच्या गाड्या फोडल्या
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफांना घेराव घालण्यात आला तर नांदेडमध्ये खासदार चिखलीकरांच्या ताफ्यातील गाड्या फोडण्यात आल्या. हिंगोलीत माजी सहकारमंत्र्यांना गावबंदी करण्यात आली.
Maratha Reservation : मराठ्यांविरोधात राज्य सरकार षडयंत्र रचत असल्याचा सर्वात मोठा आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलाय.. मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच (PM Narendra Modi) आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.. त्यासोबतच कुणबी प्रमाणपत्रासाठी असलेल्या शिंदे समितीवरही जरांगेंनी सवाल उपस्थित केलीय. कुणबी प्रमाणपत्र समितीच आम्हाला नको अशी मोठी मागणी त्यांनी केलीय. आता मराठा समाज सरकारला झोपू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून दिलाय. मराठ्यांची मुलं मोठी होऊ नये हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोपही जरांगे-पाटील यांनी केला आहे.
मराठा समाज आक्रमक
दरम्यान, आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घालण्यात आला. पाटगावमध्ये नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी मुश्रीफांच्या गाड्यांचा ताफा अडवला. मुश्रीफांना घेराव घालत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय.. तर त्याआधी कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरातही मुश्रीफांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला होता.. मराठा आरक्षणावरुन सरकारने फसवल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यालाही सकल मराठा समाजाने विरोध केला आहे. अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला येऊ नये अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे.
नांदेडमध्ये मराठा समाजाने भाजप खासदाराच्या ताफ्यातला गाड्या फोडल्यायत. नेत्यांना गावबंदी करण्यात आलीय. मात्र तरीही गावात प्रवेश केल्याने भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. चिखलीकरांच्या ताफ्यातल्या दोन गाड्या फोडण्यात आल्या. कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात काल रात्री ही घटना घडली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग याच्या भेटीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर रात्री अंबुलगा गावात गेले होते. तेव्हा हा प्रकार घडला. दरम्यान आजारी मित्राला भेटण्यासाठी गेलो होतो, तरुणांनी गाडया फोडल्या. असा उद्रेक योग्य नाही अशी प्रतिक्रिया खासदार चिखलीकरांनी दिलीय.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक झालाय. पूर्णा तालुक्यात माजी सहकारमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी प्रवेश केला. यावेळी मराठा तरुणांनी त्यांना खडेबोल सुनावलं. तर औंढा तालुक्यातील जवळा बाजार इथं माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे आले असता त्यांना मराठा तरुणांनी घेराव घालत जाब विचारला.
पुण्यातील राजगुरूनगरमध्ये मराठा बांधवांनी मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू केलंय. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. आरक्षण मिळेपर्यंत आरक्षण सुरूच ठेऊ, असा इशारा आंदोलकांनी दिलाय. माथाडी कामगारांनी आज एकदिवसीय कामबंद आंदोलन पुकारलंय. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी एपीएमसी मार्केट आज बंद असेल. या बंदमुळे कांदा बटाटा आणि दाणा मार्केटमधील व्यवहार ठप्प झालेत.