पुणे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर राज्यसभा खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षण मिळाले पाहिजे, असे म्हणत त्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीराजे यांच्या उद्याच्या आंदोलनाला (Sambhaji Raje's agitation) महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून हे आंदोलन सुरु होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मूक आंदोलनाला उद्यापासून कोल्हापुरातून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त खासदार संभाजीराजे यांनी समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करुन हे आंदोलन करण्यात यावे, असेही त्यांनी मराठा समाजाला सांगितले आहे.  


संभाजीराजे यांच्या आंदोलनावर राज्य सरकारची काय भूमिका असेल, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या सरकारचा या आंदोलनाला पाठिंबा असेल. उद्या कोल्हापूरला आंदोलनस्थळी पालकमंत्री, मंत्री आमदार सगळे उपस्थित राहतील. त्यांची भूमिका समजून घेणार आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे ते करणार, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे.


दरम्यान, आंदोलन करण्यापूर्वी त्यांनी आंदोलनाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते कोल्हापुरात शाहू समाधीस्थळावरुन ते संवाद साधत होते. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी शाहू समाधी स्थळावर पाहणी केली. उद्या मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती मूक आंदोलन करणार आहेत. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी उलटसुलट बोलू नये, कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे यावेळी संभाजीराजे म्हणाले. कार्यकर्त्यांनी काही काळ गोंधळ घातल्यानंतर संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.