`मराठ्यांनो, एकजूट दाखवून द्या` मनोज जरांगे-पाटील यांचं आवाहन... जालनात जाहीर सभा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने 40 दिवसांचा वेळ मागून घेतला होता, यातले 30 दिवस शनिवारी पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची जालनात जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी केली जात आहे.
Maratha Reservation : कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो, आता घरी थांबू नका, कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलंय. शनिवारी जालन्यातल्या (Jalna) आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांनी आयोजित केलेली भव्य मराठा सभा होतेय. या सभेची जोरदार तयारी झालीय. 5 हजार स्वयंसेवक त्यासाठी तैनात करण्यात आलेत. गैरसोय होऊ नये म्हणून दवाखाना,पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आलीय. याचसंदर्भात पोलिसांनीही सुरक्षेसंदर्भात आढावा बैठकही घेतली. शांततेत सभेला येण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय. या सभेसाठी धुळे-सोलापूर महामार्गावरची वाहतूक 3 वेगळ्या मार्गांनी वळवण्यात आलीय.
मुदतीचे 30 दिवस पूर्ण
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या सभेची जय्यात तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारनं 40 दिवसांचा वेळ मागून घेतला. शनिवारी या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होतायत त्याच पार्श्वभूमीवर अंतरवाली-सराटीत जरांगेंची सभा होतेय. राज्यभरातील मराठा संघटनांचे प्रतिनिधी जालन्यात दाखल व्हायला सुरुवात झालीय..
आरक्षणाची लढाई,सभेची जंगी तयारी
250 एकरचं मैदानात मनोज जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. यासाठी 2 हजार पोलीस कर्मचारी आणि 550 होमगार्ड तैनात करण्यात आलेत. 50 खाटांचा दवाखाना, 300 डॉक्टर्सची सुविधा असणार आहे. 100 हून अधिक प्रसाधनगृहं असणार आहेत. 5 हजार मराठा समन्वयक तैनात करण्यात आलेत चहा, गाडीचे मोफत पंक्चर, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक 3 ठिकाणी वळवण्यात आलीय.
मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे प्रखर आंदोलन करतायत. सरकारला दिलेल्या मुदतीचे 30 दिवस शनिवारी पूर्ण होतायत. त्याच पार्श्वभूमीवर सरकारला आपल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी जरांगे सभा घेतायत. आता सभेतून जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सदावर्तेंचा आरोप
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची स्टंटबाजी सुरू असल्याची टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केलीय. जरांगे पाटलांच्या माध्यमातून 14 ऑक्टोबरपासून महाराष्ट्र पेटवण्याचा घाट घातला जातोय त्यामुळे जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी केलीय. तर गुणरत्न सदावर्ते हे मराठाद्वेषी असून मराठा आरक्षणात विष कालवण्याचं काम करत असल्याचा पलटवार जरांगेंनी केलाय....