`26 जानेवारीला मुंबईत शक्तिप्रदर्शन करा, त्रास झाल्यास मंत्र्यांना...` मनोज जरांगेंचं आवाहन
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघाला आहे. येत्या 26 जानेवारीला मुंबईत धडक देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
Maratha Reservagtion : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली अंतरवालीहून निघालेल्या मराठा मोर्चाचा (Maratha Morcha) आज चौथा दिवस आहे.. काल रांजणगावमध्ये मुक्कामी असलेला हा मोर्चा आज पुण्यातील खराडी बायपासच्या दिशेनं वाटचाल करतोय. मोर्चातील आंदोलकांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था भीमा कोरेगाव येथे करण्यात आलीय. आज रात्री हा मोर्चा पुणे शहरातील खराडी बायपास चंदननगर येथे मुक्कामी असणार आहे. 26 जानेवारीला मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय. 26 जानेवारीला मुंबईच्या गल्लोगल्लीत मराठे दिसतील. जर मुंबईत त्रास झाला तर मंत्र्यांना घेराव घालण्याचं आवाहनही जरांगेंनी मराठा समाजाला (Maratha Samaj) केलंय..
मुंबईत शांततेत दोन दिवस बसलो तरी आरक्षण मिळणार आहे, पण त्रास झाला तर मात्र मंत्र्यांना घेराव घाला असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. मराठा आरक्षणातून आपलं पोरगं अधिकारी होताना पाहायचं स्वप्न आहे. मी तुमच्यात असेल नसेल मला माहित नाही पण विचार मरु देऊ नका आणि मराठ्यांची एकजुट फुटु देऊन नका अशी आर्त हाक जरांगे पाटलांनी मराठा समाजाला दिली आहे.
राजकारणात येणार नाही
समाजकारण सोडून राजकारणात जाणार नाही अशी घोषणाच जरांगे पाटील यांनी केलीय. झी 24 तासशी बोलताना जरांगेंनी ही घोषणा केली. कोणतीही निवडणूक लढवणार नाही किंवा राजकीय पक्षातही जाणार नसल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलं. मराठ्यांना आता परत पाठवणं शक्य नाही. तसंच मराठे कधीच मोकळ्या हाताने जात नसतो असं सांगत सरकारला इशाराही दिलाय..
छगन भूजबबळांवर टीका
येवल्याचं येडपट आमच्या नादी लागू नको, असं म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळांचं नाव न घेता हल्लाबोल केलाय. एकदा आरक्षण मिळू द्या मग त्यांच्यात किती मस्ती आहे ते बघतोच. तसंच, जातीच्या वाटेला जो जाईल त्याचा उभा कार्यक्रमच करायचा असा इशाराही जरांगेनी दिलाय.
पुनर्विचार याचिकेवर सुनावणी
मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिकेवर बुधवारी म्हणजे 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती आणि आणखी दोन न्यायमूर्तींसमोर ही सुनावणी होई. मराठा आरक्षणाबाबत कोर्टानं खुली सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे. निश्चितपणे हा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल असा विश्वास याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केलाय. दरम्यान, मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आज पासून राज्यभर सर्वेक्षण करतंय. आठ दिवस ही मोहीम चालणारेय.. या मोहीमेअंतर्गत जवळपास अडीच कोटी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात येईल. त्यासाठी सव्वा लाख प्रगणक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीये..
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला लातूर जिल्ह्यात सुरूवात झालीय. या मोहिमेत एकही कुटूंब वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जातेय. यासाठी 9 हजार 685 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय.