Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आमरण उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. यादरम्यान मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या सभा होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. तुम्हाला मराठे इतके सोपे वाटतात का? असा सवाल विचारत नुसती नाटकं सुरु असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांचे घोटाळे मागे घेतले. पण मराठा आरक्षणाबाबत प्रक्रियाच सुरु आहे. तुम्हाला राज्य शांत बघायचं नाहीए का असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपला जीव गेला तर महाराष्ट्राची लंका होईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठ्यांना फसवत आहेत. मराठ्यांना फसवणाऱ्यांचा हिशेब होणार, असं सांगतानाच, मराठ्यांविरोधात भुजबळांना अजित पवारांचं बळ असल्याचा आरोप त्यांनी केलाय.


नारायण राणे यांचं आव्हान
मनोज जरांगे यांच्या इशाऱ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आव्हान दिलं आहे. पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, म्हणणाऱ्या जरांगेनं मोदी येतील तेव्हा जागेवरुन हलून दाखवावं, असं आव्हान राणेंनी दिलंय, तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल,  आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असं नारायण राणेंनी म्हटलंय


जरांगेंची तब्येत खालावली
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांची तब्बेत खालावलीय जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव होतोय . त्यांच्या  उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. आजही उपचार करुन घेण्यास जरांगेनी नकार दिला आहे.  अखेर नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या शिष्टाईला यश आलं. जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टर व्यासपीठावर दाखल झाले. जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. 


महाराष्ट्र बंदची हाक
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आलीये. अहमदनगर शहरांत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. व्यावसायिकांनी बाजारपेठा बंद ठेवल्यात. त्यासोबतच कर्जत, जामखेड, पाथर्डी या ठिकाणीही बंद पाळण्यात आलाय. सोलापूरमध्येही बंदची हाक देण्यात आलीये. मराठा समाजाकडून कोंडी गावात कडकडीत बंद पाळला जातोय. गावात सकाळपासून सर्व दुकानं बंद आहेत. तर केवळ दुध आणि अत्यावश्यक सेवा सुरू आहे.


महाराष्ट्र बंदला जालन्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. सकल मराठा समाजानं मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठींबा देत आज महाराष्ट्र बंदची हाक दिलीये. जालन्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. नांदेडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आलाय. आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलंय. त्यानुसार जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिलाय. हिंगोलीत जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बंद पुकारण्यात आला. सेनगाव, औंढा, वसमत, जवळा बाजारात कडकडीत बंद पाळला जातोय. तसंच पांघरा शिंदे इथं मराठा बांधवांनी रॅली काढली. अनेक ठिकाणी मराठा बांधवांनी एकत्र येत जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला.


लातूर जिल्ह्यात मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलय. त्यापार्श्वभुमीवर शहरात घोषणाबाजी करत सरकारनं जरांगेंचं उपोषण तातडीनं सोडवण्याची मागणी करण्यात आली. तसंच समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. नाशिकमध्ये मराठा समाजाकडून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी गेल्या 5 दिवसांपासून मनोज जरांगेंच उपोषण सुरूय. त्यांची तब्ब्येत खालावल्यानं तातडीनं सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंच उपोषण सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय. 


नाशिकच्या मनमाडमध्ये महाराष्ट्र बंद हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.मराठा आरक्षण अध्यदेशाचे शासनाने कायद्यात रूपांतर करावे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. मनमाडसह नांदगावमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला.