Manoj Jarang patil News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरुच आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आवाहन मराठा आंदोलकांना केलं आहे. दुसरीकडे बीडमध्ये बोलताना तुमचा 48 पैकी एकही खासदार लोकसभेत निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीडमध्ये झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काहीही झालं तरीही मी माझं इमान विकणार नाही. आज मराठ्यांच्या अवलादी नसल्यासारखं काही लोक वागत आहेत. काही लाखांसाठी फुटून हे लोक विरोधात बोलत आहे. मी चुकीची बाजू लावून धरलेली नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.


"देवेंद्र फडणवीसांना जाहीर सांगतो आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून करणार आहात. पण मला जे करायचं ते पण मी करणार आहे. कुठलेही व्हिडीओ आणा, कसलेही रेकॉर्डिंग आणा मी आरक्षण घेणार म्हणजे घेणारच. वेळ पडली तर समाजासाठी वेगळं आंदोलन करेन. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विरोधात इमानदार पोरगा लढतोय याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे होतं तर तुम्ही खरे राजकारणी. मात्र फडणवीस हे बेगडी राजकारणी आहेत. मी वडवणीतून तुम्हाला आव्हान देतो आहे. तुम्ही मला बदनाम करा, कट रचा मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.


"मी जेलमध्ये सडलो तरीही चालेल पण समाजाशी गद्दारी करणार नाही. या जगात चांगलं काम करणं अवघड झालं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं, लोकशाही मार्गाने काम करणंही जड झालं आहे. इंग्रज आणि निजाम यांच्या काळातही असं होत नव्हतं. देवेंद्र फडणवीसांनी मागच्या 20 ते 22 दिवसांपासून मराठा समाज वेठीला धरला आहे. काहीही कारण नसताना त्रास देणं सुरु आहे. मात्र बाबा तुला माहीत नाही, देवेंद्र फडणवीस मला अटक करायला हिंमत लागते. सहा कोटी मराठ्यांना ओलांडून माझ्यापर्यंत यायचं आहे. राज्यात आम्हाला घरं आहेत तशी तुमचीही घरं आहेत हे विसरु नका," असंही आव्हान मनोज जरांगेंनी दिलं.