Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांनी पूर्णपणे अन्नपाण्याचा त्याग केलाय. त्यांची परिस्थितीत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तसतसा मराठा समाजाचा आक्रोशही वाढत आहे. दुसरीकडे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याचा पुनरोच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा समाज मागास असून आरक्षणासाठी पात्र आहे असा अभिप्राय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी दिलाय. मागासवर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सोपवण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अहवालानुसार 40 टक्के लोकांनी मराठा समाज मागास असल्याचं सांगितलंय. तर 41 टक्के लोकांनी मराठा समाज मागास नसल्याचा अभिप्राय दिलाय. ज्या 40 टक्के लोकांनी मराठा समाज मागास असल्याचं सांगितलंय. त्यातील 9 टक्के लोकांना ओबीसीतून आरक्षण नकोय. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण मिळायला हवं अशी मागणी त्यांनी केलीय. 


दरम्यान 20 तारखेच्या विशेष अधिवेशनात कायद्याच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. 


'हा मुख्य अहवाल नव्हे'


राज्य मागासवर्ग आयोगाचा हा मुख्य अहवाल अद्याप समोर आला नाही. तर सर्वेक्षणावर राज्यभरातून ज्या हरकती आणि सुचना ई मेलच्या मागविण्यात आल्या होत्या त्यावर आधारित अहवाल असल्याचे सांगण्यात येत आहे. 


या अहवालात 31 टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचा अभिप्राय दिलाय. तर 9 टक्के लोकांनी मराठा समाज मागास असला तरी मराठा समाजाल ओ बी सी कोट्यातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केलीय.


41 टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिक दृष्ट मागास नसल्याचा अभिप्राय दिलाय. तर 6 टक्के लोकांनी या सर्वेक्षणालाच विरोध केलाय. तर 5 टक्के लोकांनी सर्वेक्षणातील त्रुटी दाखवून दिल्या. 8 टक्के लोकानी इतर मते नोंदवली आहेत. 


आरक्षणासाठी विशेष अधिवेशन


मराठा समजला टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी 20 तारखेला विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. शिवसेनेच्या महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात ते बोलत होते.मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असा पुनरोच्चारही त्यांनी केला. 


'फडणवीसांनी फसवलं'


आरक्षण बाबत 2018 मध्ये फडणवीस यांनी फसवलं. आता कायदा आणला जाणार आहे. त्यावर चर्चा व्हावी. मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा झाली? हे ही कळलं पाहीजे. सरकार अविर्भाव आणत आहेत,आता शिंदे फडणवीस सरकार आहे ही फसवाफसवी सुरू आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी केलीय. आम्ही शाहू फुले आबेडकर मानणारे लोक आहेत.आम्ही मराठा आरक्षण मिळाले पाहिजे या मताचे आहोत. निवडणूक पार्श्वभूमीवर फसवाफसवी होऊ नये. पृथ्वीराज चव्हाण यांनी पण आरक्षण दिलं होतं ते टिकल नाही, असेही ते पुढे म्हणाले.