Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. सरकारने आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी दुसरीकडे या मागणीमुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. दुसरीकडे आता पुणे (Pune) दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळ यांनाही स्वराज्य संघटनेने शासकीय विश्रामगृहात घुसून इशारा दिला आहे. गाडी फोडण्यासाठी काही वेळ लागणार नाही असा इशारा स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी छगन भुजबळ पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. मात्र यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांच्या गाडी जवळ येऊन त्यांना चॅलेंज दिलं. धनंजय जाधव यांनी त्यांची गाडी छगन भुजबळ यांच्या गाडी शेजारी लावली आणि दोन्ही गाड्यांमधील अंतर दाखवलं. धनंजय जाधव यांनी गाडी फोडण्यासाठी काही वेळ लागणार नाही असा इशाराच पोलिसांसमोर दिला. ओबीसी नेत्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या आरक्षणाला नख लावू नये. छगन भुजबळ हे वारंवार वक्तव्य करून दोन समाजांमध्ये वाद लावत आहेत. त्यांनी हे वेळीच थांबवावं, असा इशारा धनंजय जाधव यांनी दिला.


दुसरीकडे, हे सर्व सुरू असताना पोलिसांनी धनंजय जाधवला आत मध्ये कसं सोडलं असा संतप्त सवाल ओबीसी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना विचारला. या सगळ्या प्रकारानंतर धनंजय जाधव यांना पोलिसांनी गेटच्या बाहेर काढले. या घटनेनंतर ओबीसी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. हिंमत असेल तर समोरुन या लपून येऊ नका असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला.