Maratha Reservation : सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण (Kunbi Reservation) द्या, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) पहिल्या दिवसापासून करतायत. त्यांच्या या दाव्याला आता बळ मिळताना दिसतंय. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कुणबी दाखले सापडू लागलेत. जुने रेकॉर्ड तपासताना सोलापुरातील भोसे गावात कुणबी दाखल्यांची नोंद असल्याचं समोर आलंय. भोसेसारख्या लहानशा गावात 1885 पासूनचे 25 पेक्षा जास्त दाखले सापडलेत. 1800 ते 1900 या काळातील दाखले मोडी लिपीत तर त्यानंतरचे दाखले मराठीमध्ये सापडले. सध्या ज्यांच्याकडे मराठा अशी नोंद आहे त्यांच्या पूर्वजांची नोंद ही मराठा कुणबी असल्याचं या दाखल्यांमधून स्पष्ट झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर पुणे जिल्ह्यात महाळुंगेमध्ये सख्ख्या भावांच्या दोन जाती असल्याचं समोर आलंय. शाळेच्या दाखल्यांवर एक भाऊ कुणबी तर एक भाऊ मराठा असल्याची नोंद आहे. जना कृष्णाजी आंबटकर - कुणबी आणि सुदाम कृष्णाजी आंबटकर - हिंदू मराठा अशी या दोन भावांची जात नोंदवण्यात आलीय.. आंबेगाव तालुक्यातल्या फक्त एका गावातच 1120 नोंदी आढळल्यायत. एकाच घरातले सख्खे भाऊ कुणबी-मराठा आहेत असा भक्कम पुरावा मिळालाय, हे जरांगेंच्या मागणीनंतर मराठा आरक्षणाच्या लढ्याला मिळालेलं मोठं यश मानलं जातंय.


जरांगेंच्या आंदोलनानंतर गावोगावी पुराव्यांची शोधाशोध सुरु झाली. त्यात कुणबी-मराठा एकच असल्याचे हजारो पुरावे सापडले. दुसरीकडे हे पुरावे शोधताना काही मराठा राजकारण्यांनी आधीच स्वत:ची नोंद कुणबी करत कुणबी प्रमाणपत्र काढल्याचीही माहिती समोर आल्याचं समजतंय. 


आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यांची वेळ वाढवून दिली आहे. पण गेल्या काही दिवसात मराठा आरक्षणासाठी हिंसक आंदोलनं झाली. विदर्भात हिंगोली, सेनगाव ,वसमत, औंढा, कळमनुरी या पाचही तालुक्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. काही ठिकाणी टायर जाळत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. हिंगोलीतल्या बासंबा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यामुळे विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला. तर सेनगावमध्ये हिंगोली-रिसोड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. औंढा नागनाथ इथेही महामार्ग अडविण्यात आला होता. 


रायगडमध्ये सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलं..माणगावमध्ये शेकडो मराठा बांधव रस्त्यावर उतरले. दोन्हीबाजूंकडे जाणारी वाहतूक रोखून धरली. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकच्या चांदोली-चौफुलीवर रास्तारोको करण्यात आला. रस्ता अडवल्यामुळे वाहतूक खोळंबली. निफाड तालुक्यातील चांदोरी रस्त्यावर मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लातूरमध्येही मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा आंदोलकांनी आंबेजोगाई-लातूर महामार्ग अडवला. रेणापूर फाटा इथे हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे 3 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेणापूर शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत आपली दुकानं कडकडीत बंद ठेवली.