Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आता आर-पारची लढाई सुरु केली आहे. मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या उपोषणानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसात मराठा समाजातील  तरुणंच्या आत्महत्यांचं सत्र सुरु झालंय. मराठा आरक्षणासाठी काही दिवसांपूर्वी औंढा तालुक्यातील एका 18 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या (Suicide) केली होती. वडीलांकडे फी भरायला पैसे नसल्याने या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगोलीत तरुणाची आत्महत्या
आता हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील देवजना इथल्या कृष्णा यशवंतराव कल्याणकर नावाच्या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली. देवजना परिसरातील एका शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास लावून घेत कृष्णाने आत्महत्या केली. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कृष्णाच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी आढळली आहे, मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे,असा चिठ्ठीत मजकूर लिहलेला आहे, मागील काही दिवसांपासून कृष्णा फक्त मराठा आरक्षण याबाबतच बोलत होता, असं त्याच्या ओखखीतल्या लोकांनी सांगितलं.


नांदेड जिल्ह्यातील तरुणाची आत्महत्या
त्याआधी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एका तरुणाने आत्मह्या केली होती. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे शुभम पवार याने लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. मुंबईवरून परत गावाकडे येत असताना विष पिऊन अर्धापूर गावाजवळ त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय शुभम पवार हा प्लंबर म्हणून काम करत होता.


जालना जिल्ह्यातील तरुणाची आत्महत्या
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय तरुण सुनील बाबुराव कावळे याने मुंबईत आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट लिहिली होती. यामध्ये त्याने मराठा आंदोलनाचा मुद्दा मांडला, मुंबईतील मराठा आरक्षण दिवसाचा उल्लेख करत शांतता पाळण्याचं आवाहन केलं. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ट्वीट करत या आत्महत्येची माहिती दिली. सुनील कावळेचा मृतदेह वांद्रेत सापडला होता.


मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी फोनवरून जरांगे पाटलांशी संवाद साधून त्यांना उपोषण न करण्याची विनंती केली. मात्र, जरांगे यांनी महाजनांची विनंती धुडकावून लावली. त्यांनतर संध्याकाळी अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनीही जरांगे यांची भेट घेऊन राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत कारवाई करत असल्याचं सांगत लेखी आश्वासनाचं पत्र घेऊन आले. मात्र ही देखील विनंती जरांगे पाटलांनी धुडकावून लावली. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं सांगत तहसीलदारांना माघारी पाठवलं. आता राज्य सरकारकडून जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी काय पाऊलं उचलली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.