कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी : नागपूरमध्ये (Nagpur) दोन दिवसांपूर्वी अंधश्रद्धेचा (Superstition) धक्कादायक प्रकार समोर आला होता. सहा वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेने आई-वडिलांनी मुलीची भूतबाधेतून मुक्तता करण्याच्या नावाखाली तिला जबर मारहाण केली. यात सहा वर्षीय मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राल हादरवून सोडले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या क्रूर घटनेचा अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे निषेध नोंदवला आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपला वाढदिवस स्मशानभूमीतच साजरा केला आहे.


देऊळबंद, बंदी शाळा, पोष्टर गर्ल, अबक, 66 सदाशिव, परफ्युम, भिरकीट या मराठी चित्रपटात बाल भूमीकेसह अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या आर्या घारे (Marathi actress aarya ghare) हिने तिचा वाढदिवस (Birthday) चक्क स्मशानभूमीत साजरा केला आहे. समाजात रुजत असलेली अंधश्रद्धा आणि त्यातून घडणाऱ्या घटना यातून आर्याने हा निर्णय घेतला.


काय म्हणाली आर्या? 


"नागपूरमध्ये पाच वर्षाच्या चिमुरडीचा अंधश्रद्धेमुळे जीव गेला आहे. समाज अंधश्रद्धेमध्ये का वाहून चालला आहे? श्रद्धा ठेवा पण त्याचा अतिरेक करु नका. अनेक जण म्हणतात की, स्मशानभूमीत भूत प्रेत असतात. मी कोणाच्याही मताला चुकीचे बोलणार नाही. पण इथे भूत प्रेत असतील असं मला तरी नाही वाटत. कारण गरिब असला किंवा श्रीमंत असला तरी तो इथेच येतो. सगळ्यांचे अंतिम स्थान स्मशानभूमीतच असते. जर इथे आपल्या आत्म्याला शांती मिळत असेल तर ही भूमी अपित्र कशी?" असा सवाल आर्या घारेने केला आहे.


"त्यामुळे इथे वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तसेच तरुणांनी पुढे येईन अंधश्रद्धेला थांबवलं पाहिजे. त्याकरता माझा छोटासा प्रयत्न आहे. मी कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न करत नाहीये. मला ट्रोल केलं तर दहा लोक चांगलं बोलतील आणि वीस लोकं वाईट बोलतील," असंही आर्या म्हणाली.