Marathi Actress Worried About Law And Order Situation In Maharashtra: राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी याच मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यातच या आठवड्यांमध्ये पुण्यामध्ये तब्बल 4 हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.


कोणी केली आहे ही पोस्ट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने सोशल मीडियावरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल भाष्य करताना संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात यापूर्वी पासून असलेल्या समस्यांमध्ये मागील काही काळापासून वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांची भर पडली असून महाराष्ट्र यापूर्वी असा कधीही नव्हता असं तेजस्वीनीने म्हटलं आहे. ब्रोकन हार्ट इमोजीसहीत तिने ही पोस्ट केली आहे.


काय म्हटलं आहे पोस्टमध्ये 


तेजस्वीनीने "दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच. आता सर्रास गोळीबार, खून, ड्रग्ज...? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता," अशी पोस्ट आपल्या अधिकृत एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन केली आहे.




काहींनी केली टीका काहींकडून कौतुक


तेजस्वीनीच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया चाहत्यांनी नोंदवल्या आहेत. 'सोलापूर सुनबाई' नावाच्या अकाऊंटवरुन तेजस्वीनीने भूमिका घेतल्याबद्दल तिचं कौतुक करण्यात आलं आहे. "खूप खूप आभाळभरून कौतूक तुझं तेजस्विनी... जिथे मोठी मोठी लोक मूग गिळून गप्प बसली आहेत तू न घाबरता निर्भीडपणे आपलं मत मांडत आहेस. महाराष्ट्रासाठी उभी आहेस," असं तेजस्वीनीचं कौतुक करताना 'सोलापूर सुनबाई'ने म्हटलंय. "आधी 100 कोटींची वसुली व्हायची. उद्योगपतीच्या घराजवळ उदबत्त्या लावायचे. कळवा खाडीत पोलीसच खून करुन पुरावा नष्ट करायचे. संत वाजे समाजकार्य करायचे. यादी मोठी आहे," अशी उपहासात्मक प्रतिक्रिया अन्य एकाने नोंदवली आहे. रुपेश नावाच्या व्यक्तीने, "तेजस्विनीजी आता कदाचित तुमच्यावर काहीतरी आरोप केले जातील... ट्रोल केलं जाईल! पण महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असू अशाच व्यक्त होत रहा," असं म्हटलं आहे. 


"रिकामं डोकं सैतानाच घर असते असं म्हणतात. चित्रपट किंवा मालिका नसणार हातात. मोकळ्या वेळेत मनोरंजन चांगलं आहे," असा टोला 'कर्ण' नावाच्या अकाऊंटवरुन लगावला आहे. तर मंगेश वंजारी नावाच्या व्यक्तीने तेजस्विनीचं कौतुक केलं आहे. "सांप्रत काळात असे बोलावयास अंगी धाडस लागते. मराठी कला क्षेत्रातील बहुतांशी कलाकार जिथे सत्ताधीशांच्या वळचणीला उभे राहण्यात धन्यता मानतात. तिथे तुमच्यासारखी कणा असलेली माणसं बघून अभिमान वाटतो तुमचा तेजस्विनीजी," असं मंगेश यांनी म्हटलं आहे.



55 हजारांहून अधिक वेळा तेजस्विनीची ही पोस्ट पाहिली गेली आहे.