Pooja Chavhan case | संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
टीकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड अडचणीत आले होते.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण ( pooja chavhan ) मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड ( sanjay rathod ) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी अखेर सही केली आहे.
टीकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. याप्रकरणात काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे पूजा मृत्यू प्रकरणी संशयाची सुई संजय राठोड यांच्याकडे जात होती. पूजाच्या मृत्यूनंतर तिच्यासोबत राहणारा अनिल राठोड सुद्धा फरार आहे. स्वतः संजय राठोड 15 दिवस माध्यमांसमोर आले नव्हते.
15 दिवसांनंतर संजय राठोड बाहेर आले परंतु पोहरादेवी येथे आपलं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी होय. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पटली नसल्याचे बोलले जाते. त्यानंतर राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी जास्त दबाव वाढला. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होण्याआधी संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना दिला होता.
राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी तो स्विकारून राज्यपालांकडे का पाठवला नाही याबाबत प्रश्नांची सरबत्ती विरोधकांकडून सुरू राहिली. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांच्या राजीनाम्यावर सही केली आहे. राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे.