Dr Ramchandra Dekhane Died : संत साहित्याचे गाढे अभ्यासक भारुडकार डॉ रामचंद्र देखणे यांचं निधन
डॉ रामचंद्र देखणे (Dr Ramchandra Dekhane) यांच्यावर उद्या (27 सप्टेंबर) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुणे : अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. मराठी लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे (Dr Ramchandra Dekhane Died) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर देखणे संध्याकाळी पूजा करत होते. या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान त्यांच्यावर उद्या (27 सप्टेंबर) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (marathi writer practitioner of saint literature dr ramchandra dekhane died at age of 67 due to heart attack)
डॉ. रामचंद्र देखणे यांचा जन्म एप्रिल 1956 साली झाला होता. रामचंद्र देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा होती. वडिलांच्या कीर्तनात ते लहानपणी अजाणतेपणी टाळकरी म्हणून उभे रहात आणि खड्या आवाजात अभंगातली चरणे म्हणायचे. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन आणि भारूड या कला प्रकारांशी ते आपोआप जोडले गेले. गावच्या जत्रेत किंवा पालखी, दिंडी सोहळ्यात रामचंद्र देखणे वेगवेगळी सोंगे आणून भारुडे करू लागले.
पुणे विद्यापीठातून पीएच. डी.
रामचंद्र देखणे हे जरी भारुडांत रंगून जात त्तरी त्यांच्या अर्थाकडे त्यांचे लक्ष नसे. आई जेव्हा भारुडातील ’दादला नको गं बाई’ किंवा, ’नणदेचं कार्टं किरकिर करतंय’ आदी प्रतीकांचा अर्थ विचारू लागली. तेव्हा त्यांनी भारुडांवर संशोधन करायला सुरुवात केली. ’भारुड वाङमयातील तत्त्वज्ञान - संत एकनाथांच्या संदर्भातल्या या त्यांच्या प्रबंधास 1985 मध्ये पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त झाली. या प्रबंधाला डॉ. मु.श्री. कानडे पुरस्कार समितीचा १० हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला.
रामचंद्र देखणे यांची कारकीर्द
रामचंद्र देखणे हे पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. त्यांनी तब्बल ३४ वर्ष नोकरी केली. यानंतर ते 30 मे 2014 सेवानिवृत्त झाले.
ऑक्टोबर 2004 ला राळेगणसिद्धी येथे ग्रामजागर साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं.
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे जानेवारी 2011 मध्ये जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे झालेल्या 12व्या "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमलना'चे अध्यक्षपद.
अमेरिकेत झालेल्या विश्व साहित्य संमेलनातील "संतसाहित्य आणि आधुनिकता' या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र देखणे होते.
सासवडच्या मराठी साहित्य संमेलनप्रसंगी (जानेवारी 2014) ‘प्रश्न आजचे उत्तरे संतांची’ या विषयावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदी रामचंद्र देखणे होते.