औरंगाबाद : दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मराठवाड्यात गेल्या आठ महिन्यांत तब्बल ५८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव पूढे आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलेल्या आकडेवारीत हे वास्तव पूढे आले आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमध्ये सर्वाधीक १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सततचा दुष्काळ, मध्येच पडणारा पाऊस, अचाणक होणारी गारपीठ, नापीकी, पीकांवरील रोग या सर्वांचा परीणाम म्हणून होणारा कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे. वास्तवीक पाहता शेतकरी जगण्यासाठी प्रचंड संघर्ष करत असल्याचे चित्र आहे. मात्र, त्याच्या कोणत्याच उपायाला यश न मिळाल्यामुळे तो आत्महत्येचा मार्ग निवडतो, असे मत अभ्यासक नोंदवतात.


दरम्यान, शेतकऱ्याला नैसर्गिक आणि आर्थिक आरिष्टातून बाहेर काढण्यासाठी अनेक योजना हाती घेतल्याचे सरकार सांगते. सरकारने अनेक प्रकल्प हाती घेतलेही आहेत. मात्र, सातत्य नाही. कर्जमाफीचेही असेच झाले आहे. सरकारने कर्जमाफी केली. तसे जाहीरही केले. वास्तवात मात्र कोणत्याही शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही. आता तर सरकार आपली भूमिकाच बदलताना दिसत आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि सरकारकडून रोज नवी विधाने होत आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचा सरकारवरचा भरोसा उडल्याची चर्चा राज्याच्या ग्रामिण भागात सुरू आहे.