मराठवाड्यातला बंद | उस्मानाबादेत हिंसक वळण
महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिंसक वळण लागलं. शेतक-यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील 5 बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या.
औरंगाबाद : 1) महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिंसक वळण लागलं. शेतक-यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील 5 बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या. यात कळंब तालुक्यात मोहा आणि मस्सामध्ये 3 तर लोह-यामध्ये 2 बसेसची तोडफोड करण्यात आली. उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी परीसरातील संतप्त शेतक-यांनी समुद्रवाणी तांडा रस्त्यावर जाळपोळ करून आणि अर्धनग्न आंदोलन करत रस्ता रोको केला. त्यामुळे उस्मानाबाद-औसा रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती.
2) लातूरमध्ये शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. औसामध्ये शासकीय दूध योजनेचा टँकर शेतक-यांनी फोडला. या बंदला व्यापा-यांनी दुकानं बंद ठेऊन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. लातूर, निलंगा, औसा, जळकोट, अहमदपूर, शिरूर, ताजबंद, उदगीर, मुरुडसह संपूर्ण जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय छावा संघटना आणि शिवसेनेनंही या संपाला पाठिंबा दर्शवला.
3) नांदेड जिल्ह्यातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नांदेड जिल्ह्यातील सर्व सोळा तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अगदी गावपातळीवर बंदला प्रतिसाद मिळाला. या बंद दरम्यान काही ठिकाणी हिंसक वळणही लागलं. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव पाटीजवळ एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. यात पाच बसेसच्या काचा फोडण्यात आला.
4) जालन्यातील अंबडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
5) जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या वरूड बुद्रुक गावात भजनी टाळ,मृदुंग वाजवत सर्व गावातून मिरवणूक काढून गावक-यांनी महाराष्ट्र बंद आंदोलनाला आगळा वेगळा पाठिंबा दर्शवला. त्यानंतर गावातील मुख्य चौकात एकत्र येत दूध रस्त्यावर ओतून दिलं. गावातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात शेतातील डाळिंब रस्त्यावर फेकून देऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.शिवाय गावातील सर्व दुकानं बंद ठेऊन महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यात आला.
6) हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संपाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समित्या बंद ठेऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय. परभणी आणि हिंगोली या दोन्ही महत्वाच्या शहरातील शंभर टक्के बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. जागोजागी रास्ता रोको करून शेतकऱ्यांनी कुठं टायर जाळलीत तर ठिकठिकाणी भाजीपाला रस्त्यावर फेकून देऊन सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.
7) हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. सेनगाव शहरात सर्व बाजार पेठा बंद ठेऊन राज्य महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. तर बाजारपेठेत दूध आणि भाज्या फेकून देऊन रास्ता रोको करण्यात आला. सवड इथंही हिंगोली सेनगाव राज्यरस्ता दोन तास अडवण्यात आला होता. तर सेनगाव तालुक्यातील गोरेगावात शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गोरेगावच्या शेतक-यांनी सरकारविरोधात आंदोलन केलं.