दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातल्या आठ तालुक्यांमध्ये सरकारनं मध्यम दुष्काळ जाहीर केलाय. मात्र यात मराठवाड्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळं यंदातरी मराठवाड्याची दुष्काळापासून सुटका झाल्याचं दिसतंय. यवतमाळ जिल्ह्यातले पाच, जळगाव जिल्ह्यातील दोन आणि वाशीम जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश करण्यात आलाय. एकनाथ खडसे यांनी डिसेंबर महिन्यातच जळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर दुष्काळी तालुक्यात खडसे यांच्या मुक्ताईनगरचा  आणि त्याच्या शेजारच्या बोदवड तालुक्याचा समावेश करण्यात आलाय. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव, दिग्रस, घांटजी, केळापूर हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जून ते सप्टेंबर २०१७ या कालावधीमध्ये कमी झालेला पाऊस, भूजल पातळीत झालेली घट, पाण्याची उपलब्धतता, पेरणीखालील क्षेत्र, पिकांची उपलब्धतता या सर्व गोष्टींचा विचार करून प्रभावीत झालेल्या तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. 


दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळणाऱ्या सवलती 


- जमीन महसूलात सूट


- सरकारी कर्जाचे पुर्नगठन


- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती 


- कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट 


- शालेय, महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी


- रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता 


- पाणी पुरवठ्यासाठी टॅंकर्सची सोय


- शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे 


- मध्यान्ह भोजन योजना दीर्घ मुदतीच्या सुटीच्या काळातही सुरू ठेवण्यात येणार


दरम्यान,  एप्रिल महिन्यातच मराठवाड्यातील पाणीसाठा खालावत चालला आहे. मराठवाड्यातील प्रमुख धरणं असलेल्या जायकवाडी धरणात 45 टक्के इतका  पाणीसाठा उरलाय. यावेळी धरण १०० टक्के भरलं असल्यानं शेतीसाठी सुद्दा आवर्तनं देण्यात आली आहेत. जायकवाडी धऱणातून जिथं जिथं पाणीपुरवठा होतो.. तिथं तरी यावर्षी अडचण येणार नाही,  मात्र इतर ठिकाणी पाण्याची अडचण कायम आहे, संपुर्ण मराठवाड्याचा विचार करता आता मराठवाड्यातील ८६७ प्रकल्पात सध्या फक्त २२.९१ टक्के इतकाच पाणीसाठा उरला आहे.. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात सध्या २६५ गावांना ३२४ टँकरनं पाणीपुरवठा सुरु आहे... त्यामुळं मे महिन्यात पाणी टंचाई नागरिकांचे हाल करणार असं चित्र दिसतेय.