VIDEO : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ! नद्यांना पूर; पाण्यात बस, जनावरं वाहून गेली तर हिंगोली 25 जण पुरात अडकली
Marathwada Rain : अहमदनगर, नाशिक पाठोपाठ आता विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातलाय. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत पावसाने जोरदार बॅटींगमुळे नदी नाल्यांना पूर आलाय.
Marathwada Rain : मुंबईसह पुण्यात पावसाने दांडी मारली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने थैमान घातलं. अतिवृष्टीमुळे हिंगोली (Hingoli), यवतमाळ (Yavatmal), वाशिम, परभणी (Parbhani), नांदेडला मोठा फटका बसलाच चित्र आहे. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्यांवरही परिणाम झालाय.
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ
मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घालाय. पुराच्या पाण्यात बस वाहून गेलीय. मानवत तालुक्यातील वझुर बुद्रुक गावात पाथरी आगाराची मुक्कामी असलेली बस पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. बसमध्ये चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख झोपलेले होते. बस मध्ये पाणी शिरल्याचा आवाज येत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र बस चालू झाली नाहीय.. काही वेळेतच बस पुराच्या पाण्यातून वाहून गेली.. चालकांनी प्रसंगावधान राखून गाडीतून उडी घेतल्यानं त्यांचे प्राण वाचलेत.
हिंगोलीत पावसाचा कहर
हिंगोली जिल्ह्यात पावसानं कहर केलाय. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. देवजना परिसरात पुराच्या पाण्यात 25 जण अडकलीयेत. यासोबतच जनावरंही पुरात अडकलीये. वाढता पाऊस बघून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला होता. मात्र अल्पावधीतच पुराचं पाणी वाढल्यानं संपूर्ण जिल्ह्याला पुरानं वेढा घातलाय. यामुळे अनेक जनावर पाण्यात अडकल्याचं दिसून आलं.
करपरा नदीला पूर, शेती पाण्याखाली
परभणीत मुसळधार पावसामुळे करपरा नदीला पूर आलाय. मात्र यामुळे पुरात शेकडो जनावरे वाहून गेलीय. अनेक गावात पाणी ही शिरलं, असून पुरात अनेक गाड्या वाहून गेल्यात. तसंच शेती पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावात घरांची पडझड झालीय. यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. तसंच प्रशासनाने नागरिकांना ही सतर्कतेचा इशारा दिलाय.
निसर्गाचा शेतकऱ्यांवर कहर
बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. यात सोयाबीन, मूग उडीद आणि कापूस यां खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतला आहे. तसेच उर्वरित पिके पाण्याखाली असल्याने शेतकरी चिंतेत आहे बीडच्या शिदोड यांच्या शेतात काढून ठेवलेल्या मुगाच्या पिकात पाणी साचल्याने दोन एकर मुगाचे नुकसान झाले आहे.. तर तळ्याचे रूप आले आहे.
नदीकाठच्या 100 गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यात 24 तासांपासून मुसळधार पावसाने दाणादाण उडवलीय. तेरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीवरील सर्व दरवाजे 30 सेटींमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग केला जातोय. शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होतेय. हवामान विभागाने आँरेज अलर्ट जारी केलाय .प्रशासनाने नदीकाठच्या 100 गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
रेस्क्यूचा थरार
हिंगोलीत पुराच्या पाण्यातून 6 जणांचं रेस्क्यू करण्यात आलं. सेनगावमध्ये एक शेतकरी कुटूंब शेतात राहत होतं. मुसळधार पावसामुळे हे कुटुंब शेतात अडकून पडलं. रात्री उशिरा रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होत पुरात अडकलेल्या महिला आणि मुलांची सुखरुप सुटका केली.
देव तारी त्याला कोण मारी!
कारंजा तालुक्यात पुराच्या पाण्यात एक वृद्ध व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडलीये. जयपूर- शाह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. या पुराच्या पाण्यातून वाट काढताना हा वृद्ध व्यक्ती वाहून गेला. सुदैवाने गावाकऱ्यांनी पुढे काही अंतरावर पुरात उडया मारल्या आणि वृद्धाचा जीव वाचवलाय. त्यामुळे पुरांच्या पाण्यातून वाट काढू नये असा अवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय.
वाहतूक ठप्प
परभणीमध्ये अतीमुसळधार पावसामुळे गोदावरी, दुधना, करपरा या नद्यांनी धोक्याच्या पातळी ओलांडलीय. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं, वाहतूक ही ठप्प झालीय. पावसामुळे हजारो हेक्टर वरील पिके ही पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
जालन्यातील मंठा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय. त्यामुळे पाटोदा, मंठा, सावंगी, पेवा, देवठाणा या गावांना पुराचा फटका बसलाय. गावामध्ये पाणी भरण्याची शक्यताये. त्यामुळे 200 ते 250 गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.
मुसळधार पावसाने बीडच्या धारुर तालुक्यातील गुणवरा नदीला पूर आलाय. पुराचं पाणी नदी काठच्या घरांमध्ये शिरलंय तर शेती पाण्याखाली गेलीये. परिसरातील अनेक नदी नाले ओसंडून वाहतायत.
यवतमाळमधील गावात तलावाचं स्वरुप
यवतमाळच्या बंदी भागात पुराचं पाणी शिरलंय. यामुळे दराटी गावाला तलावाचे स्वरूप आल्याचं पहायला मिळतय. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे, नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामुळे प्रशासनाने तातडीने नागरिकांसाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.