अश्विनी पवार, झी २४ तास, पुणे : दुपारी गरज असेल तरच घराबाहेर पडा. सध्या दिवसभर सतत पाणी पीत राहा... याचं कारण म्हणजे, गेल्या आठवड्यापासून राज्यभर उष्णतेची लाट आहे. पुढच्या ४८ तासांत उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. कोकण वगळता हवामान कोरडं असल्यानं उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागलाय. त्यामुळेच, पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यप यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तापमान वाढीचा परिणाम आरोग्यावर होतोय. या बदललेल्या वातावरणामुळे ताप सर्दी डोकेदुखी या आजारांनी डोकं वर काढलंय. पोट बिघडल्याच्याही तक्रारी वाढत आहेत. या आजारांमुळे दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालीय. या उन्हाळ्यात बाहेरचं खाणं टाळा, असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. 


आत्ता तर कुठे मार्च महिना संपून एप्रिलला सुरुवात झालीय. अजून उन्हाळ्याचे तब्बल दोन महिने बाकी आहेत... त्यामुळे, स्वत:ची आणि जवळच्यांची तब्येत सांभाळा... काळजी घ्या!