३५ लाखांचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
या गांजाची किंमत ३५ लाख ३८ हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नितेश महाजन, झी मिडिया, जालना : जालन्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ३५ लाख रुपयांचा ७१ किलो गांजा जप्त केला असल्याची माहिती मिळत आहे. जालना शहरातील संजय नगर भागात ही कारवाई करण्यात आली. संजय नगर भागात राहणाऱ्या एका नागरिकाच्या घरात गांजाचा मोठा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत ७१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत ३५ लाख ३८ हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, गांजाची चोरटी विक्री आणि साठवणूक करणाऱ्या भारत पवार आणि दीपक हिवाळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या दोघांविरोधात अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.