मारकडवाडी होणार ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा केंद्रबिंदू?
Markadwadi EVM: नवनियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी बोलावण्यात आलेलं विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस मारकडवाडीच्या मुद्यावर गाजला.
Markadwadi EVM: महायुती सरकारच्या काळातील पहिल्याच विशेष अधिवेशनात विरोधकांचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला. आमदारांच्या शपथविधीसाठी बोलावण्यात आलेल्या अधिवेशनात मारकडवाडीचा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधीला नकार देत सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा केंद्रबिंदू मारकडवाडी होण्याची शक्यता आहे.
नवनियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी बोलावण्यात आलेलं विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस मारकडवाडीच्या मुद्यावर गाजला. मारकडवाडीच्या गावकऱ्यांनी बॅलेटवर मतदानाची तयारी केली होती. पोलीस आणि प्रशासनानं मारकडवाडीच्या गावकऱ्यांवर गुन्हा दाखल केला. काहीं गावकऱ्यांना अटक झालीय. त्यामुळं संतापलेल्या विरोधकांनी आज थेट आमदारकीच्या शपथविधीवर बहिष्कार घातला. नाना पटोलेंसह अनेक आमदारांनी स्वतः शपथ घेणं टाळलं. आमदारकीची शपथ घ्यायची की नाही याबाबत पुढं निर्णय घेणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आय लव्ह मारकडवाडी नावाचे बॅनर विधिमंडळ परिसरात झळकवले. त्यांच्यासोबत विरोधी पक्षांचे बहुतांश आमदार आंदोलनात सहभागी झालेत. तासगावचे आमदार रोहित पाटील यांनीही शपथ सोडून आंदोलनात सहभाग नोंदवला.
विरोधकांचं आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. अधिवेशानाच्या दुसऱ्या दिवशी आमदारांना शपथ घ्यावीच लागणार आहे, अन्यथा विरोधक आमदारांना कामकाजात सहभागी होता येणार नाही असंही दादांनी सांगितंलय.शपथेवर बहिष्कार घालणे म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानं विरोधकांचा आवाज क्षीण झालाय असा सत्ताधाऱ्यांचा समज होता. पण मारकडवाडीच्या मुद्यावर महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधकांनी गाजवून सोडलाय. मारकडवाडीत शरद पवार भेट देणार आहेत. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेही मारकडवाडीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं येत्या काळात मारकडवाडी गावाचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. बॅलेट पेपरवर मतदानासाठी पुढाकार घेणारं सोलापुरातील मारकडवाडी हे गाव देशभरातील ईव्हीएम विरोधाचा केंद्रबिंदू होण्याची शक्यता आहे. बॅलेटपेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवार स्वतः रविवारी मारकडवाडीत जाणार आहेत. राहुल गांधींचंही मारकडवाडीत जाण्याचं नियोजन असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येतंय.
मारकडवाडीच्या या लढ्यात विरोधी पक्षाचे सगळे नेते आणि आमदार त्यांच्यासोबत आहेत अशी ग्वाही जितेंद्र आव्हाडांनी दिलीय. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळात आंदोलन केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली. स्वतः उद्धव ठाकरेही मारकडवाडीला जातील असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगण्यात आलं. मारकडवाडीच्या आंदोलनाला देशपातळीवर नेऊन ईव्हीएमविरोधात रान उठवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी मारकडवाडीचा दौरा केल्यास मारकडवाडीला प्रतिक बनवून देशविरोधात ईव्हीएमविरोधी जनआंदोलन उभं करण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहणार आहे.