मारकडवाडीपासून सुरु झालेला ईव्हीएमविरोधात लढाई दिल्लीपर्यंत नेण्याचा मविआचा निर्धार
Markarwadi EVM Controversy : शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. यात कांग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही सहभागी झाले होते. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा आग्रह पराभूत उमेदवारांनी केला.
Markarwadi EVM Controversy : मारकडवाडीपासून सुरु केलेला ईव्हीएमविरोधाची लढाई मविआनं दिल्लीपर्यंत नेण्याचा निर्धार केलाय. एका बाजूला रस्त्यावरची लढाई आणि दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढाईसाठी महाविकास आघाडी सज्ज झालीय. काँग्रेस नेत्यांसोबतच आपच्या नेत्यांनाही सोबत घेऊन कायदेशीर लढाई लढण्याचा पवारांनी निश्चय केलाय.
महाराष्ट्रातला ईव्हीएमविरोधातला लढा दिल्लीपर्यंत नेण्यासाठी शरद पवार आणि काँग्रेसनं कंबर कसलीय. दिल्लीत शरद पवारांनी पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती. ईव्हीएमविरोधात कायदेशीर पुरावे गोळा करणे आणि त्यानंतर न्यायालयीन लढा लढण्याची रणनिती शरद पवार आणि काँग्रेसची आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यासाठीच दिल्ली गाठलीये. निवडणूक आयोगानं एक निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन ज्या शंका आहेत त्या शंका दूर कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केलीय.
शरद पवार आणि पराभूत आमदारांची बैठकीत काय झाली चर्चा ?
- बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारी संदर्भात संशय व्यक्त करण्यात आला.
- मतदार याद्यांमध्ये करण्यात आलेल्या दुरुस्ती आणि मतदारांच्या संख्येत वाढ यावरती देखील चिंता व्यक्त करण्यात आली.
- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने विधानसभा निवडणुकीत उपयोगात आणलेल्या ईव्हीएम संदर्भात बैठकीत संशय व्यक्त करण्यात आला.
- ईव्हीएम बॅटरी च्या संदर्भात देखील बैठकीत चर्चा करण्यात आली आणि सोबतच संशय व्यक्त करण्यात आला.
- राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या पराभूत उमेदवारांच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची का? यावरती देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाचे विरोधात याचिका दाखल करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा.
- सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठविधीज्ञ डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत आज रात्री आठ वाजता सर्व पराभूत उमेदवारांची बैठक.
- बैठकीला सुनील भुसारा, मेहबूब शेख प्रशांत जगताप, संदीप दोडके, संदीप वरपे,राहुल कलाटे, अशोक पवार, संजय जगताप, बाळासाहेब थोरात , पांडुरंग बरोरा आदींची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली.
शरद पवार ईव्हीएमसंदर्भात अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांच्याशी चर्चा करणार आहेत. ईव्हीएमविरोधात रस्त्यावरचा लढा आणि सोबत कायदेशीर लढा लढण्यासाठी विरोधक तयार झालेत. दिल्लीतल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीमुळं दिल्लीतही ईव्हीएमविरोधी लढ्यासाठी वातावरण निर्मिती झालीये.