वयाची पस्तिशी उलटूनही लग्न होत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी तरुणांची अस्वस्थता वाढली आहे. याचा फायदा काही मध्यस्थ लोक घेताना दिसून येत आहे. मध्यस्थी ची भूमिका घेत लग्न जुळवली जातात आणि चार पाच दिवसात ही नवरी मुलगी घरातील सर्व दागिने घेऊन पसार होते. विशेषतः नगर जिल्ह्यात हे प्रकार वाढतांना दिसतायेत. मात्र आता या मध्यस्थीने लाखो रुपये घेत चक्क एका तृतीयपंथीयाशी मुलाचे लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील एका विवाहइच्छूक तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे.  या मुलाकडून लग्नासाठी या महिला एजंटने लाखो रुपये घेतले होते. मात्र लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरी मुलगी ही तृतीयपंथी असल्याचं नवरदेवाला समजले. 


काय आहे प्रकरण
श्रीगोंदा तालुक्यातील एका तरुणाने औरंगाबाद येथील एका एजंट महिलेशी लग्नासाठी मुलगी मिळवून देण्याकरिता संपर्क केला. या महिलेने ही मुलगी मिळवून देण्यास होकार दिला. याकरिता एजंट महिलेने तरुणांकडून पैश्याची मागणी केली. 


यानंतर महिलेने जालना येथील एक मुलीसोबत लग्नाची बोलणी करून दिली. नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघांच्या ही संगनमताने लग्न ठरले. काही ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न पार पडले. आवश्यक त्या सर्व धार्मिक विधी सुद्धा करण्यात आले. नवरा मुलगा हा लग्न झाल्याने खुश होता. तो पुढील आयुष्याचे स्वप्न रंगवत होता. मात्र लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरी मुलगी ही तृतीयपंथी असल्याचं उघड झालं. आणि नवरदेवाचे स्वप्न भंगले. 


आपले पितळ उघडे पडल्याचे लक्षात आल्याने   तृतीयपंथीने नवरदेवासह त्याच्या नातेवाईकाला मारहाण केली. पीडित कुटुंबाने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार केली. भांडाफोड झाल्यानं तृतीयपंथीने तेथून पळ काढला.  


पोलिसांनी केले आवाहन
सध्या मुलांचे लग्न लवकर जुळत नसल्याने कुठलीही विचारपूस न करता नवर देवासह त्यांचे नातेवाईक लग्नास तयार होत असतात. याचा फायदा ही मध्यस्थी करणारी टोळी घेताना दिसून येते. राज्यात अश्या टोळ्या सक्रिय असून नातेवाईकांनी मुलाचे लग्न करत असताना मुलीची आणि तिच्या नातेवाईकांची चौकशी केल्या शिवाय लग्न जुळवू नये असे आवाहन पोलिसांन कडून करण्यात आल आहे.