Mahad Fire : महाड एमआयडीसीतील मल्लक स्पेशालीटी या कारखान्यात बुधवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या कारखान्यातील इथिनोल ऑक्साईड प्लँटला ही आग लागली असून, अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू होते.  घटनास्थळी छोटे छोटे स्फोट होत असल्यामुळं आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. पण अखेर दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. 


अखेर आग नियंत्रणात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश हाती आलं. 10 फायर फायटर आणि खाजगी टँकरच्या सहाय्यानं ही आग नियंत्रणात आली. काही ठिकाणी अद्यापही आगीचं धुमसणं सुरुच आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलिये. या आगीचा फटका शेजारच्या कंपन्यांनाही बसल्याचं कळत आहे. दरम्यान, या भागात ज्वलनशील घातक रसायन असल्याने खबरदारी म्हणून परिसर रिकामा करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या. 


सध्याच्या घडीला आगीचा धुर लांबपर्यंत दिसत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या एकंदर परिस्थितीमुळं जवळपासच्या परीसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 


घटनास्थळी मोठ्या प्रमाणात इथीनॉल ऑक्साईड जळत आहे. यामध्ये एका टाकीतील साठा जळून खाक झाला असून, दुसऱ्या टाकीला स्फोट होऊन मोठी आग लागली होती, त्यामध्ये 18 हजार लिटर साठा होता. सदरील परिस्थिती गंभीर झाल्या कारणानं आजूबाजूचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला आहे.


आग नेमकी कशामुळं लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं प्राथमिक स्तरावर सांगण्यात येत आहे. असं असलं तरीही घटनास्थळी होणारे मोठे स्फोट पाहता नजीकच्या परिसराला हादरा बसत असल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाकडून सध्या या घटनेवर लक्ष ठेवण्यात आलं असून, काही महत्त्वाची पावलंही उचलली जात आहेत.