Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad Fire) चिखली भागातील एका हार्डवेअरच्या दुकानाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने (fire brigade) घटनास्थळी धाव घेतली होती. शॉटसर्किट मुळे ही आग लागली असल्याचा  प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली असून कुलिंगचे काम सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी चिंचवडच्या चिखली भागातील सचिन हार्डवेअरमध्ये हा सगळा भीषण प्रकार घडला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मृत सर्वजण हे पहाटे गाढ झोपेत असतानाच हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय 10), भावेश चौधरी (वय 15) अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याच हार्डवेअर दुकानात संपूर्ण चौधरी कुटुंब वास्तव्यास होतं. पहाटे गाढ झोपेत असल्याने कोणालाच घराबाहेर पडता आलं नाही. आग इतकी भीषण होती की सर्वांचा दुकानातच जागीच मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. 



दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली? याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.