मुंबई : अवकाळी आणि गारपिटीनं राज्यातल्या शेतक-यांचं अतोनात नुकसान झालंय. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं पुन्हा एकदा हिरावून घेतलाय. तब्बल दोन लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात गेलीयेत. हे नुकसान कसं भरून निघणार हाच सवाल आता शेतकऱ्याला पडला आहे. (massive loss of farmers in maharashtra due to unseasonal rains and hailstorms)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी आणि गारपिटीचं थैमान सुरूं आहे. निसर्गाचा कहर शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. कुठं गव्हाचं पीक भुईसपाट झालंय. तर कुठे ज्वारी, मका, हरबऱ्यासारखी रब्बी पिकं हातातून गेली आहेत. यंदा वाढलेल्या दरामुळे कापसातून चार पैसे हाती येतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. 



मात्र पावसानं शेतकऱ्यांच्या हातून पांढरं सोनंही हिरावून घेतलं आहे. पपई, संत्रा, केळीच्या बागांची स्थिती याहून वेगळी नाही. मराठवाडा आणि विदर्भातलं हे विदारक चित्र. आकडेवारीचं गणित म्हणाल तर तब्बल दोन लाख हेक्टरहून अधिक पिकं भुईसपाट झाली आहेत.


अवकाळी आणि गारपिटीनं यंदा पुन्हा एकदा सर्वात मोठा फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसलाय. अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यातील 50 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झालंय. 


तर औरंगाबाद, लातूर धुळे, जालना, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपुरात तब्बल 60 हजार हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीचा मोठा फटका बसला होता. अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात 1 लाख 40 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकासान झालंय. 


नुकसानीबाबत हा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता हे नुकसान कसं भरून निघणार, हाच सवाल अवकाळीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना पडलाय.