माऊलींचा मुक्काम आजोळघरी गांधी वाड्यात
भक्तीरसाने चिंब झालेले वारकरी.. टाळ, मृदुगांचा गजर.. फडफडणा-या भगव्या पताका अन माऊली माऊली नामाचा जयघोष.
आळंदी : भक्तीरसाने चिंब झालेले वारकरी.. टाळ, मृदुगांचा गजर.. फडफडणा-या भगव्या पताका अन माऊली माऊली नामाचा जयघोष, अशा चैतन्यमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. माझिया जीवाची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी या ओळी सार्थ ठरवत लाखो भाविकांना कृतार्थतेची भावना अनुभवली.
पहाटेपासूनच वैष्णवांचा मेळा इंद्रायणीकाठी जमलाय. भाविकांच्या गर्दीनं आज आळंदी दुमदुमून गेलंय. इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर भक्तीचा नाद आसंमतांत भिडलाय. माऊलीच्या सहवासाची आणि विठूरायाच्या भक्तीची आस बाळगून राज्याच्या कानाकोप-यातून नव्हे तर अन्य राज्यातूनही लाखो वारकरी आलेत.
माऊलींच्या पालखीचा देखणा प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी मंदिर परिसरात वारक-यांसह सा-यांचीच प्रचंड गर्दी आहे. दिंड्या मंदिरप्रदक्षिणे वेळी हरीनामाचा जागर, टाळमृदुगांचा गजर करत बेभान होऊन लक्षवेधी अशी रिंगण करत वारकरी भक्तीरसात न्हाहून गेलेत. प्रस्थानानंतर माऊलींचा मुक्काम आजोळघरी गांधी वाड्यात असणार आहे.