औरंगाबाद : नाशिकमधल्या झा़डाचे आंबे खाल्ल्यानंतर मुलं होतं, हा संभाजी भिडे गुरुजींचा दावा चर्चेत असतानाच आणखी एक अंधश्रद्धेचा बाजार उघड झालाय. हा अंधश्रद्धेचा बाजार मांडला होता औरंगाबादमधल्या खुल्ताबादमध्ये. झाडावरचं फळ खा, मूलं होतील झाडावरचं फळ दिलं तर हिजड्यालाही मूल झालं, असा धक्कादायक दावा करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सगळा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये राजरोस सुरू आहे. खुलताबाद गावाजवळच्या दर्ग्यात मांडलेला हा अंधश्रद्धेचा बाजार. हजरत शेख शहा जलालूद्दीन रवा यांच्या दर्ग्यात दोन झाडं आहेत. आशेचं झाड असं नाव असलेल्या झाडांची फळं खाल्ली तर मुलं होतात, असा इथल्या मौलवी मुहम्मद समीर मुजावरचा दावा आहे. पहिल्या झाडाचं फळ खाल्ल्यावर मुलगा तर दुसऱ्या झाडाचं फळ खाल्ल्यावर मुलगी होते, असं हा मौलवी सांगतो.


दर्ग्याच्या बाजूला 'परियो का तालाब' नावाच्या तळ्यात महिलांनी विवस्त्र होऊन अंघोळ केली तर एड्स आणि कॅन्सरसकट सगळे रोग बरे होतात असा त्याचा धक्कादायक दावा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शहाजी भोसले यांनी यासंदर्भात स्टिंग ऑपरेशन करुन त्याचं पितळ उघडं केलंय. अंनिसने या मौलवीच्या विरोधात तक्रार दाखल केलीय. 


या अंधश्रद्धेच्या बाजारावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलीय. अंनिसनं मौलवीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आता पोलीस पुढचा तपास करत आहेत. लवकरच या मौलवीच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे. पण लोकांनो, कृपया या असल्या अंधश्रद्धेच्या प्रकारांना भुलू नका. आणि स्वतःचीच फसगत करुन घेऊ नका.