क्षुल्लक कारणावरून औरंगाबादमध्ये दंगल- महापौर
हिसाचार झालेल्या ठिकाणी अद्यापही रस्त्यावर जळालेल्या वाहनाचे अवशेष दिसत आहेत. तर, काही ठिकाणी दगडांचा खच दिसत आहे.
औरंगाबाद : प्रचंड मोठा पोलिसफाटा, संतापलेले नागरिक, दगडफेक, आश्रुधूर आणि जळणारी दुकाने यांमुळे औरंगाबाद शहरातील मोतीकारंजा भाग सध्या जोरदार धुमसत आहे. या भागासह शहरातील इतर परिसरावरही दंगलीचे मोठे सावट पसरले आहे. वातावरणात तणावपूर्ण शांतता आहे. पण, हा वाद पेटण्यामागे अगदीच किरकोळ कारण असल्याचे समजते. औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पाणी भरण्याच्या क्षुल्लक कारणावरून हा वाद निर्माण झाला. दरम्यान, नागरिकांनी शांतता राखावी तसेच, अफवांवर विश्वास ठेऊ नये असे अवाहनही घोडेले यांनी केले आहे.
वाहनांची मोठया प्रमाणावर जाळपोळ
दरम्यान, औरंगाबाद शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलिसांसोबतच आमदार, खादसार आणि स्थानिक नेतेही प्रयत्न करत आहेत. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार यांनी दंगलग्रस्त भागाची फिरून पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधत असल्याची माहितीही घोडेले यांनी दिली आहे. पाणी भरण्याचा अत्यंत क्षुल्लक असा वाद होता. पण, त्याचे रूपांतर मोठ्या वादात झाले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मोतीकारंजा भागात जोरदार हिंसाचार झाला. हिंसक झालेल्या जमावाने दुकाने तसेच वाहनांची मोठया प्रमाणावर जाळपोळ केली.
रस्त्यांवर दगडांचा खच
दरम्यान, हिंसाचारात तलवार, चाकू, लाठ्य़ाकाठ्यांनी जमावाने एकमेकांवर हल्ला केला. यात तुफान दगडफेकही करण्यात आली. हिंसाचारात लोकांना पांगवताना पोलिसांनी लठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. जमावाच्या दगडफेकीत पोलीसही जखमी झाले. या हिंसाचारात २५ ते ३० जण जखमी जाले आहेत. तर, २५ दुकानांना आग लावण्यात आली. पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बळाचा वापर केरावा लागला. हिसाचार झालेल्या ठिकाणी अद्यापही रस्त्यावर जळालेल्या वाहनाचे अवशेष दिसत आहेत. तर, काही ठिकाणी दगडांचा खच दिसत आहे.