Measles outbreaks in Maharashtra : राज्यातल्या गोवर संशयित रुग्णांचा आकडा 10 हजारांवर गेला आहे. यातली एकूण 658 बालकं गोवरबाधित आहेत. तर गोवरने राज्यातल्या 13 बालकांचा मृत्यू झाला. त्यातलेही 9 मृत्यू संशयित आहेत. पण मृतांमध्ये लस न घेतलेल्या बालकांचा समावेश आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जातोय.  बालवाड्या, पाळणाघरं, अतिजोखमीच्या भागांवर प्राधान्यानं लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय झालाय. तर केंद्रानंही मार्गदर्शक सूचना केल्यायत. त्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली.


मुंबईतला गोवरचा फैलाव रोखण्यासाठी जोरदार तयारी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतला गोवरचा फैलाव रोखण्यासाठी आता बीएमसीने जोरदार तयारी केलीय. मुंबईत जवळपास दीड लाख बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्याचा निर्धार बीएमसीने केलाय. त्यासाठी बीएमसीने दीड लाख मुलांच्या नावांची यादीच तयार केलीय. राज्य सरकारकडून परवानगी आल्यावर बीएमसीने तातडीने ही यादी तयार केलीय. जिल्हापातळीवर टास्कफोर्स तयार करून गोवरच्या स्थितीचा सतत आढावा घेतला जाईल. मुंबईत दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये गोवरचा उद्रेक झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या भागांमध्ये बीएमसी अतिरिक्त लसीकरण करण्याची शक्यता आहे. सोमवारपासूनच ही मोहीम सुरू करण्याचे बीएमसीचे प्रयत्न आहेत. 


मुंबईतील आठ महानगरपालिका वॉर्ड गोवरने बाधित झाले आहेत आणि सर्वाधिक प्रादुर्भाव (5) एम-पूर्व वॉर्डमध्ये दिसून आला आणि त्यानंतर तीन एल वॉर्डमध्ये (सर्व ईशान्य मुंबईत). गोवरच्या आठ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सात एम-पूर्व प्रभागातील आणि एक एल प्रभागातील आहे. यापैकी, फक्त एका मुलाने गोवर लसीचा एक डोस घेतला होता, तर उर्वरित लसीकरण न केलेले होते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.


भिवंडीत क्वारंटाईन सेंटर सुरु



गोवर रोखण्यासाठी भिवंडीत क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आलंय. मुंबई पाठोपाठ गोवरचे सर्वाधिक बळी भिवंडीत गेलेत. भिवंडी शहरात गोवरची साखळी तोडण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहे. गोवर क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्मचा-यांची नियुक्तीही करण्यात आलीय. संवेदनशील भागात विशेष कॅम्प घेण्यात येणार आहेत. आयसोलेशन सेंटरसोबतच कोरोनाच्या धर्तीवर वॉर रूम स्थापन करण्यात येणार आहे.