Dhananjay Munden, Abdul Sattar and Manoj Jarange meet : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. 8 पैकी केवळ 1 जागा मिळवण्यात महायुतीला यश आलं होतं. त्यानंतर जरांगे फॅक्टरची जोरदार चर्चा रंगलीय. लोकसभेच्या निकालाचं प्रतिबिंब विधानसभेला उमटू नये म्हणून महायुती सतर्क झाल्याचं चित्र आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी मध्यरात्री मनोज जरांगे पाटलांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय. दोन दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनीही मध्यरात्री अंतरवालीत जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली होती. बंददाराआड झालेल्या चर्चांमुळे विविध अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र आरक्षणासह शेतक-यांच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे महायुतीच्या नेत्यांसोबत गाठीभेटी तर दुसरीकडे जरांगे देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल दररोज हल्लाबोल करताना दिसताहेत. आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीसांना टार्गेट करणारे जरांगे मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादांवर जाहीर टीका करत नाहीत. याचाच राजकीय फायदा घेण्यासाठी शिंदे गटासह अजित पवारांची राष्ट्रवादी जरांगेंशी जवळीक साधत तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर आगपाखड करणारे जरांगे पाटील आता त्यांचं कौतुक करताना दिसताहेत.


मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धग मराठवाड्यात तीव्रतेनं जाणवली. त्याचाच फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसल्याचं विश्लेषण अनेक राजकीय तज्ज्ञांनी केलंय. मराठवाड्यातील 8 पैकी केवळ १ जागा जिंकण्यात महायुती यशस्वी झाली. बीडमधून धनंजय मुंडेंसह अनेकांची ताकद सोबतीला असताना पंकजा मुडेंना पराभवाचा सामना करावा लागला. तर जालन्यात रावसाहेब दानवेंसारख्या दिग्गज नेत्याच्या पदरी पराभव आला. लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती विधानसभेला होऊ नये यासाठी महायुतीनं खबरदारी घेतल्याचं बोललं जातंय. त्यामुळं जरांगेंच्या भेटींमध्ये नेमकं काय शिजतंय, ते येत्या काळात स्पष्ट होईलच.