Mumbai News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai Pune Express Highway) आज दोन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. महामार्गावरील महत्त्वाच्या कामासाठी दुपारी 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे असा प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोई होणार आहे. महामार्गावरील ब्लॉकच्या काळात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल तर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ब्लॉकच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर लोणावळा एक्झिट येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हे काम करण्यात येणार आहे. गॅन्ट्री उभारण्याच्या कामासाठी दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. त्यामुळे या वेळेत मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. या कामामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक ही जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून वळवण्यात येणार आहे.


गुरुवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार (MSRDC) हे काम दुपारी ते दुपारी दोनच्या दरम्यान होईल. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या चालकांना खंडाळा घाटातील एक्स्प्रेस वे मधून बाहेर पडण्याचा आणि लोणावळ्याजवळील वाढवण टोल प्लाझा येथे पुन्हा प्रवेश करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील दोन मोठ्या शहरांना जोडणारा 95 किलोमीटरचा महामार्ग 2002 मध्ये सुरु झाला होता. हा देशातील पहिला प्रवेश-नियंत्रित मार्ग आहे.


दरम्यान, अपघात नियंत्रणात आणण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्यात येत आहे. संपूर्ण मार्गावर 106 पॉइंट्सवर सुमारे 430 हायटेक कॅमेरे बसवले जात आहेत. हे कॅमेरे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असतील. या कॅमेऱ्यांना झूम करून कारमध्ये बसलेल्या सर्व लोकांना ओळखता येईल. सर्व्हरवर गुन्हेगारांचा डेटा असल्यास कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या फुटेजच्या मदतीने त्यांचाही शोध घेता येतो. याशिवाय वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, चालक झोपी जाणे, सीट बेल्ट न लावणे आणि वेग मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालवणे यासारख्या रस्ते सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांनाही आळा बसू शकतो.