पुणे : समाज सुधारक हमीद दलवाईंच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचं पुण्यातील निवासस्थानी निधन झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत्युसमयी मेहरुन्निसा ८८ वर्षाच्या होत्या. २५ मे १९३० मध्ये त्यांचा पुण्यात जन्म झाला. हमीद दलवाई यांच्याशी त्यांचा १९५६ मध्ये इस्लामिक पद्धतीनं विवाह झाला... आणि एका महिन्याच्या आत त्यांनी विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नोंदणी विवाह केला. 


उर्दू भाषिक दलवाई भाभींनी अल्पावधित मराठी भाषा अवगत केली. त्यांच्या रुबिना आणि ईला या मुलींनी आंतरधर्मिय विवाह केला. हमीद दलवाई यांच्या निधनानंतर त्या 'मुस्लीम सत्यशोधक मंडळा'च्या कार्यात अधिक सक्रिय झाल्या. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्वपूर्ण कार्य केलं. 


शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम रहावा, म्हणून संघर्ष त्यांनी केला. तसंच १९८६-८७ मध्ये महाराष्ट्रात तलाक मुक्ती मोर्चा काढला होता.


मेहरुन्निसा दलवाईंनी 'हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्युट'ची स्थापना केली. त्यांचं 'मी भरुन पावले' हे आत्मचरित्र लोकप्रिय झालं. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे हमीद दलवाई यांना जाहीर करण्यात आलेला मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या वतीनं मेहरूनिस्सा यांनी स्वीकारला होता. 


मेहरुन्निसा दलवाईंच्या इच्छेनुसार हडपसर इथल्या साने गुरुजी रुग्णालयात त्यांचं देहदान करण्यात येणार आहे.