रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : मिरज पोलीस ठाण्याच्या आवारात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मोहसिन बागवान यांचा मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवकाच्या खाजगी सावकारी जाचाला कंटाळून मोहसिनने तीन दिवसापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. माजी नगरसेवक साजीद पठाण याच्या सावकारी जाचाला वैतागून मोहसीन मलिक बागवान याने तीन दिवसांपूर्वी, पोलीस ठाण्यातच विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मोहसीनवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचं निधन झालं. या प्रकरणी साजीद पठाणसह त्याच्या भावाविरुद्ध मिरज शहर पोलिसांत सावकारीसह, धमकी, मारहाणीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिरज शहर पोलीस ठाणे आवारातील शौचालयात शनिवारी सकाळी दहा वाजता मोहसीनने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. बागवान यांना उपचारार्थ मिरजेतील शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले होते.


संशयित पठाण बंधू व विषारी द्रव्य पिणारे बागवान यांच्यात यापूर्वी चांगली मैत्री होती. बागवान याने विषारी द्रव्य पिण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. या चिठ्ठीत म्हटले आहे की, 'साजीद पठाण त्याचा भाऊ जाकीर उर्फ बबलू बरकत पठाण या दोन भावांनी मला फार हैराण केले आहे. 2018 साली रईस पठाण याला साजीद पठाण याने मारहाण करुन त्याचा पाय मोडला होता. त्यावेळी आमच्या सर्वांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी साजीद पठाणसह आम्ही सगळे फरारी झालो होतो आणि त्यावेळी मला पैशाची जरुरी होती. त्यावेळी साजीद आणि बबलू यांच्याकडून मी 20 टक्के व्याजाने 50 हजार रुपये घेतले होते. आजपर्यंत व्याजासह 1 लाख 75 हजार रुपये मी परत केलेले आहेत. तरी देखील अजून 50 हजार रुपये बाकी आहेत, असे म्हणून मला त्रास देत होते. तसेच वारंवार मारहाण करीत होते.' 


'10 जून रोजी मी कुरुंदवाड येथील एका लग्नासाठी गेलो असता तेथेही मला मारहाण करण्यात आली. त्यावर मिरजेत आल्यानंतर मी आणि पत्नी दोघे मिरज शहर पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेलो होतो. याची माहिती साजीद पठाण याला मिळाल्यानंतर त्याने मला दर्गा कमानरोड जवळ रात्री 11 वाजता अडविले आणि बबलू पठाणने मारहाण केली. तसेच शिवीगाळी केली. पोलीस किंवा एसपींजवळ गेलास तरी मला काही फरक पडत नाही. कोणत्याही परिस्थितीत मी माझे पैसे सोडणार नाही. असे म्हणून मारहाण केली. सध्या माझी त्यांचे पैसे देण्याची ताकद नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझा मृत्यूस साजीद पठाण आणि बबलू पठाण जबाबदार आहेत.' असेही या चिठ्ठीत म्हटले आहे.


साजीद पठाण याच्या सावकारी जाचाला वैतागून मोहसीन मलिक बागवान याने तीन दिवसांपूर्वी, पोलीस ठाण्यातच विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मोहसीनवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना आज निधन झालं.