COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : निसर्ग चक्राचा भाग आणि उत्पतीचे कारण असलेल्या मासिक पाळीबद्दल आजही न्युनगंड पाळला जातो. पण पुण्यात राहुन वकिलीचे शिक्षण घेणारा सचिन आशा सुभाष हा मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड्सच्या प्रचारासाठी राज्यभर फिरतोय..आज मासिक पाळी दिनाच्या औचित्याने त्याने वडाळ्यातील म्हाडा चाळीतील स्त्रियांना सॅनेटरी पॅड्स बनविण्याचे प्रशिक्षण दिले. 


मुंबईच्या मध्यावर असलेली वडाळाच्या म्हाडा चाळ वसाहतीत आजही अशिक्षित आणि अस्वच्छतेचे प्रमाण जास्त आहे. समाजबंधच्या सचिन आशा सुभाष हा तरुण या ठिकाणच्या महिलांना मासिक पाळीवर जनजागृतीचे काम करतोय. मासिकपाळीच्या काळात महिला, मुलींच्या आजुबाजुला बसु नये कारण त्या वेळी त्यांच्या शरीरातून एक प्रकारची नकारात्मक उर्जा बाहेर पडत असते. असे अनेक गैरसमज सचिनने दुर केले.


मासिक पाळीत योग्य काळजी न घेतल्याने गर्भाशयाला संसर्ग होण्यापासून ते गर्भाशयाच्या कॅन्सरपर्यंत कित्येक आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. या आजारात  आजारी महिलेचे गर्भाशय काढावे लागते. त्यामुळे सांधेदुखी, भावनिक असंतुलन असे दुष्परिणाम त्या महिलेच्या शरीर आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. माझ्या आईला जंतुसंसर्गामुळे तरुण वयात गर्भाशय काढावे लागले, त्यामुळे त्या आजाराचे गांभीर्य मला जास्त माहित असल्याचे सचिन आशा सुभाष सांगतो. याच जाणिवेतून सचिन या महिलांना सॅनिटरी पॅड्स बनवण्याचे प्रशिक्षण देत आहे. यावेळी इथल्या महिलांनी सचिनला मासिक पाळी विषयी असलेले गैरसमज सांगितले. 


घरातील जुन्या कपड्यांपासून साध्या शिलाई मशीनवर सॅनेटरी पॅड्स कसे बनवता येतील याचे प्रशिक्षण सचिनने या महिलांना दिले. सचिन या पॅड्सना आशा पॅड्स म्हणतो. आशा पॅड्स हे पर्यावरणपूरक, पुनर्वापर करण्यायोग्य, जमिनीत विघटित होऊ शकतील असे तसेच केमिकल जेल किंवा प्लास्टिक घटकविरहित आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'समाजबंध'तर्फे या पॅड्सची विक्री केली जात नाही तर बनवण्यास प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिलं जातं. बाजारात गेलो तर पॅड्स 50 ते 80 रुपयाला मिळतात पण या प्रशिक्षणामुळे आता महिला हे पॅड्स घरच्या घरी बनवू शकणार आहेत.