जितेंद्र आव्हाडांच्या फेक अकाऊंटवरून अभिनेत्रींना मेसेज
जितेंद्र आव्हाड यांच्यानावे बनावट फेसबुक अकाऊंट उघडले गेल्याचे प्रकरण समोर आले आहे.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट उघडले गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. या फेक अकाऊंटमधून मराठी अभिनेत्रींसह अनेकांना मेसेज गेल्याचे कळते. सायबर क्राइमतर्फे या मागच्या मास्टरमाईंडचा शोध घेण्यात येत आहे.
आपलं फेक अकाऊंट बनल्याचा प्रकार जितेंद्र आव्हाड यांच्या दहा दिवसांपूर्वी लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलिसांत याची तक्रार केली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेवून त्यादिशेने शोध सुरू केल्याची माहिती आव्हाड यांनी माध्यमांना दिली. तसेच यासंबंधी त्यांनी फेसबुककडेही तक्रार केली आहे. पण अद्यापही हे अकाऊंट सुरूच असल्याने आव्हाडांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
'काय मेसेज केले मला माहित नाही'
बनावट अकाऊंटवरुन नेमके काय मेसेज केले ते मला माहित नाही, पण ज्यांना मेसेज गेले, त्यांनी माझ्याशी संपर्क साधून विचारणा केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले. तसेच घातपात, देशविघातक किंवा समाजविघातक कृत्य घडू नये म्हणून हे प्रकरण मी गांभीर्याने घेतल्याचेही ते म्हणाले.