अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : सिनेक्षेत्रातून सुरु झालेली हॅशटॅग मीटू चळवळ आता शिक्षण क्षेत्रातही पोहचलीयं. पुण्यातील नामवंत सिंबायोसिस विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या आजी माजी विद्यार्थिनींनी त्यांचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केलायं. समाज माध्यमांतून ही बाब उजेडात आल्यानंतर सिंबायोसिसनं दिलगिरी व्यक्त करत चौकशीचं आश्वासनही दिलंय.


कारवाईचं आश्वासन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणं म्हणजे विद्येचं माहेरघर  पण या माहेरघरातच मुली सुरक्षित नाहीत. पुण्यातील प्रतिष्ठित सिंबायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय.


सिंबायोसिसमधल्या काही विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर या प्रकाराला वाचा फोडली.


विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी देखील लैंगिक शोषण केल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केल्यानं विद्येच्या माहेरघरात खळबळ उडालीय. दरम्यान, एससीएमसी प्रशासनानं या तक्रारीची गंभीर दखल घेतलीय. या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासनही दिलंय. 


 केवळ महाविद्यालयांतर्गत तक्रार समिती स्थापन न करता पोलिसांच्या सहकार्यानं महिला दक्षता समिती स्थापन केली जावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी केलीयं.


महिला सुरक्षेचा प्रश्नच 


सोशल मीडियावरील हॅशटॅग मीटू चळवळीमुळं सिंबायोसिसमधील विद्यार्थिनींना तक्रार करण्याचं बळ मिळालं. इतर महाविद्यालयांमध्येही असे प्रकार सर्रास घडतायत. अशावेळी विद्यार्थिनींनी पुढं येऊन तक्रारी कराव्यात, असं मत महाविद्यालयीन तरूणींनी व्यक्त केलंय.


तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांनतर हॅशटॅग मीटू चळवळीनं जोर धरला. यानिमित्तानं विविध क्षेत्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर बनलाय, हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालंय.