नागपूर : राजधानी मुंबईपाठोपाठ अखेर उपराजधानी नागपूरमध्येही मेट्रो धावणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या ३० सप्टेंबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मंत्री आणि नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 


विविध शासकीय संस्था या ट्रायल रनची चाचणी करणार असून सुरक्षेच्या विविध मानकांवर यावेळी चाचणी होणार आहे. या चाचणीतून निघालेले निष्कर्षांच्या आधारे अपेक्षित ते बदल केले जातील. 


नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या उत्तर-दक्षिण मार्गावर, मिहान डेपो ते विमानतळ या सुमारे साडे पाच किलोमीटर मार्गावर ही चाचणी घेण्यात येणार आहे. 


सुरूवातीला ट्रायल रन घेतल्यानंतर वर्षअखेरीपर्यंत नागपूरकर प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू होणार आहे. याकरता प्रवासी भाडंही लवकरच निश्चित केले जाणार आहे. तर पुढच्या टप्प्यात सीताबर्डी येथून प्रवासी वाहतूक सुरु होणार आहे. 


नागपूर मेट्रोची वैशिष्टे


- नागपूर मेट्रोची एकूण लांबी - ३८.२१ किलोमीटर 


- पूर्व - पश्चिम आणि उत्तर - दक्षिण अशा दोन मार्गांवर मेट्रो धावणार


- संपूर्ण एलिव्हेटेड मार्ग


- मिहान ते ऑटोमोटिव्ह चौक असा उत्तर दक्षिण मार्ग - १९.५ किलोमीटर


- प्रजापती नगर ते लोकमान्य नगर असा पूर्व - पश्चिम मार्ग - १८.५५ किलोमीटर


- प्रस्तावित खर्च - ८ हजार ६८० कोटी


- दोन्ही मार्गावरील स्टेशनची संख्या - ३६


- नोव्हेंबर २०१५ ला प्रत्यक्ष कामास सुरुवात


- सुमारे साडे आठ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची मुहूर्तमेढ ३१ मे २०१५ रोजी रोवली गेली होती.