म्हाडाच्या 4 हजार घरांसाठी सोमवारी सोडत, विजेत्यांसाठी आत्ताच समोर आली मोठी अपडेट
Mhada Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांसाठी सोमवार 14 ऑगस्ट रोजी सोडत काढली जाणार आहे. त्याबाबत आता आणखी एक अपडेट हाती आली आहे.
Mhada Lottery 2023 Mumbai: महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकारणच्या (म्हाडा) 4000 घरांसाठी सोमवारी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी सोडत (Mhada Lottery) काढण्यात येणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात सोडत काढण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. मुंबई म्हाडा (Mumbai Mhada) मंडळसध्या सोडतीच्या कामात व्यस्त आहे. त्यातच आता अर्जदारांसाठी म्हाडाने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. (Mhada Lottery 2023 Mumbai)
म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढल्यानंतर विजेत्यांना कादपत्रांती पूर्तता करण्यासाठी बँकेत फेऱ्या माराव्या लागत होता. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्टेशन फी जमा करण्यासाठी बँकेत सारख्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, विजेत्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी म्हाडाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. म्हाडाने एकल खिडकी योजनाअंतर्गंत म्हाडाच्या मुख्यालयातच सर्व प्रक्रिया पार पाडण्याची व्यवस्था करत आहेत. भविष्यातील घरांच्या सोडतीसाठी ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
म्हाडाने या वर्षीपासून सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जदारांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणीदेखील ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली होती. यापूर्वी लॉटरी जारी केल्यानंतर अर्जदारांचे कागदपत्रे मागवले जात होते मात्र त्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण होण्यासाठी एक ते दोन वर्ष लागत होते. अशात विजेत्यांना लॉटरी जिंकल्यानंतरही प्रत्यक्षात घराची चावी हातात येण्यास अनेक वर्ष लागत होते. मात्र, आता हे काम अडीच महिन्यांतच पूर्ण होणार आहे.
कर्जप्रक्रियादेखील होणार सोप्पी
म्हाडाने विजेत्यांना सोप्या पद्धतीने कर्ज मिळवून देण्यासाठीही प्रय़त्न केले आहेत. म्हाडाने काही बँकांसोबत करार केले आहेत. म्हाडाने सोडतीनंतरच्या सर्व अनिवार्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लोकांचा त्रास वाचवण्यासाठी मोठं पाऊल उचलले आहे. म्हाडा कार्यालयातच मुद्रांक शुल्क आणि डिजिटल नोंदणी केंद्र सुरू करत आहे.लॉटरी विजेत्यांना मालमत्ता नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या गृहनिर्माण प्राधिकरण प्रक्रियेवर काम करत आहे. सर्व आगामी लॉटरी सोडतीसाठी ही सुविधा उपलब्ध असेल, असं त्यांनी पुढे नमूद केलं आहे. दरम्यान, उद्या होत असलेल्या सोडतीसाठी ई-नोंदणी सुविधा उपलब्ध नसणार आहे. कारण म्हाडाकडून अद्याप त्या प्रक्रियेवर काम सुरू आहे, असं एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4,082 घरांसाठी सोडत 14 ऑगस्ट रोजी निघणार आहे. ऑनलाइन पद्धतीने मुंबईच्या यशवंत राव चव्हाण सेंटरमध्ये काढण्यात येणार आहे. आता २०२३ मध्ये सोडतीची संपूर्ण प्रक्रिया अर्थात जाहिरातीपासून घराचा ताबा देण्यापर्यंतची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. या नव्या संगणकीय प्रणालीद्वारे काढली जाणारी ही मुंबई मंडळाची पहिली सोडत आहे.