पोलीस बंदोबस्तात गोकुळचे दूध कोल्हापूरहून मुंबईला रवाना
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव इथल्या प्लांटवरुन हे दुध मुंबई पुण्याकडे रवाना झालंय.
कोल्हापूर: स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध दर आंदोलनाला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबईसह राज्यभरात दुधाचा तुटवडा जाणवू नये यासाठी सरकारनेही कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून सरकारकडून दूधवाहक टँकर्सना पोलीस संरक्षण देत देताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ आर्थात गोकुळने दहा टँकर दूध मोठया पोलिस बंदोबस्तात मुंबई आणि पुण्याकडे रवाना केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव इथल्या प्लांटवरुन हे दुध मुंबई पुण्याकडे रवाना झालंय.
खाजगी दूध संघानी संकलन केंद्र बंद ठेवली
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपूरातून आंदोलनाची सुरूवात केल्यानंतर अनेक खाजगी दूध संघानी आपली संकलन केंद्र बंद ठेवली आहेत. तरीही हिंसक प्रकार टाळण्यासाठी दूध संकलन केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक दूध संकलन करणारा सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संकलन केंद्रातही आज शुकशुकाट आहे. रोज याठिकिणी २५ हजार लिटर दूध संकलन परिसरातील गावांमधून केलं जातं. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धसक्याने पंढरपूर तालुक्यातील दूध संकलन केंद्र बंद आहेत.
राजू शेट्टींकडून सरकारला इशारा; आंदोलकांना अवाहन
शेतकऱ्यांनी दूध आंदोलन शांततेच्या मार्गानं करावं. दुधाची नासाडी करु नये, असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांना केले आहे. पण, हे अवाहन करतानाच, दूधाला भाव दिला नाही तर, आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. दूधाला लीटरमागे पाच रुपये दरवाढ मिळावी अन्यथा आंदोलोन सुरुर रहाणार असल्याचं ते म्हणाले. नामदेव पायरीवर प्रतिकात्मक विठ्ठल रुख्मिमी मुर्तीला दुग्धाभिषेक घालत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.