दूध आंंदोलनावर तोडगा नाही, आंदोलन कायम राहणार
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेली बैठक निष्फळ ठरलीय.
नागपूर : विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेली बैठक निष्फळ ठरलीय. मुख्यमंत्र्यांसह सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत सरकारला तोडगा काढण्यात अपयश आलं. त्यामुळे पुन्हा दोन दिवसांनी म्हणजे १९ जुलैला पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. तोपर्यंत दूध कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
सर्व पक्षीय नेत्यांची बैठक
दूध दरावर तोडगा काढण्य़ासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री, दुग्धविकासमंत्री जानकर, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील. चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, संजय दत्त आणि विनायक मेटे हजर होते.
दिल्लीतही बैठक
दूध दरावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. रेल्वेमंत्री पियुष गोयल, राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. तर व्हिडीओकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी बैठकीला उपस्थिती लावली.
दूध भुकटीचा बफर स्टॉक केंद्र सरकारला करता येईल का, असा मुद्दा नितीन गडकरी यांनी मांडला. भारतातून परदेशात मोठ्या प्रमाणावर धान्य दिलं जातं. त्या देशात धान्य ऐवजी दूग्धजन्य पदार्थ पाठवता येतील, असा मुद्दा बैठकीत आला. यासंदर्भात उद्या नितीन गडकरी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करणार आहेत. रेल्वे स्टेशनवर दूग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यासदंर्भात कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी सूचना केली.