सांगली: दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरीला विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करुन आंदोलनाची सुरुवात केली. तर शिर्डीच्या पुणतांब्यातही शेतकऱ्यांनी बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन सुरु केले. यावेळी शेतकऱ्यांनी दुधाला भाव मिळालाच, पाहिजे अशी घोषणाबाजीही केली.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर सांगलीच्या इस्लामपूर येथे शेतकऱ्यांनी नेहमीचा आक्रमकपणा सोडत स्वागतार्ह पाऊल उचलले. याठिकाणी रयत क्रांतीचे नेते सागर खोत यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी दुधाचे टँकर अडवून त्यामधील दूध गरिबांना वाटून टाकले. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी हजारो लीटर दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला होता. त्यावेळी दुधाची अशाप्रकारे नासाडी झाल्यावरुन अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे आज इस्लामपूरमध्ये आंदोलक वेगळा मार्ग चोखाळताना दिसले. 

दरम्यान, आता राज्याच्या विविध भागांमध्ये दूध आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, २६ जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकऱ्यांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करा, जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करा, आणि देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्या, या मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने २० जुलैपासून राज्यात आंदोलन सुरू आहे.