कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad Police) करोडपती पीएसआय (PSI) सोमनाथ झेंडेंना अखेर निलंबित करण्यात आलेलं आहे. किमान सहा महिने त्यांचे हे निलंबन असणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तैनात असलेले उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम इलेव्हन अॅपवर (dream11) एक टीम तयार केली होती. त्यांची टीम रँक-1 वर राहिली आणि सोमनाथ यांनी 1.5 कोटी रुपये जिंकले. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर सोमनाथने माध्यमांसमोर आपला आनंद व्यक्त केला होता. ही बाब प्रकाशझोतात येताच ही बातमी पोलीस खात्यापर्यंत पोहोचली आणि अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. अखेर आता या प्रकरणी सोमनाथ झेंडे यांना निलंबित करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन पैसे लावणे तसेच वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका सोमनाथ झेंडेंवर ठेवण्यात आलाय. पण विभागीय चौकशीत त्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याची मुभा मिळणार आहे. विश्चचषकाच्या सामन्यावेळी झेंडेंनी ड्रीम 11 या ऑनलाइन गेममध्ये स्वतःची टीम लावली अन त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या आठ तासांत कोट्यधीश झाले होते. दीड कोटींची त्यांना लॉटरी लागल्यानं कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याच आनंदाच्या भरात झेंडेंनी पोलिसांच्या वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या. याच चुकीमुळे त्यांच्या आनंदावर विर्जन पडलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनीच त्याची चौकशी केली अन यात त्याचं निलंबन करण्यात आलं. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचल्याचा ठपका झेडेंवर ठेवण्यात आला आहे. आता झेंडे यांची विभागीय चौकशी होणार असून त्यात त्यांना स्वतःच म्हणणं मांडता येणार आहे.


थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार


पिंपरी-चिंचवड भाजपाचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी झेंडेविरुद्ध राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली होती. झेंडे हे कर्तव्यावर असताना ऑनलाइन जुगार खेळत असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. ऑनलाइन जुगार वा गेम यापासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शासन व विविध घटकांकडून उपक्रम राबविले जात असताना झेंडे हे ऑनड्यूटी ऑनलाइन जुगार कसा खेळतात, असा सवाल थोरात यांनी केली होता. त्यानंतर आता याप्रकरणी झेंडे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.